‘नैना’चा पथदर्शी प्रकल्प विकासाच्या टप्प्यात, निविदा मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:59 PM2019-03-05T23:59:24+5:302019-03-05T23:59:28+5:30

सिडकोचा ‘नैना’ क्षेत्राकडे स्वस्त व बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून पाहिले जात आहे. त्यानुसार सिडकोने नियोजनसुद्धा सुरू केले आहे.

Naina's pilot project has invited tender for the development phase | ‘नैना’चा पथदर्शी प्रकल्प विकासाच्या टप्प्यात, निविदा मागविल्या

‘नैना’चा पथदर्शी प्रकल्प विकासाच्या टप्प्यात, निविदा मागविल्या

googlenewsNext

नवी मुंबई : सिडकोचा ‘नैना’ क्षेत्राकडे स्वस्त व बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून पाहिले जात आहे. त्यानुसार सिडकोने नियोजनसुद्धा सुरू केले आहे. सध्या आकुर्ली येथील पहिल्या टीपी (नगररचना परियोजना) योजनेवर काम सुरू आहे, त्यानुसार सिडकोने या परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या असून, रस्ते व इतर सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
आकुर्ली गाव परिसरात सुमारे ५० एकर क्षेत्राची पहिली टीपी स्कीम तयार करून मंजुरीसाठी ती राज्य शासनाकडे पाठविण्यात आली होती. राज्य शासनाच्या संबंधित विभागाने त्यात काही सुधारणा सुचविल्या होत्या. या सुधारणेनंतर २१ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबई महानगर प्रदेशातील गेल्या तीन दशकांतील पहिली नगररचना परियोजना अर्थात टीपी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोने आकुर्ली परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यात आकुर्ली टीपीएस-१ परिसरात रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, बांधकाम क्षेत्राचे सपाटीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. मागील सात वर्षांत पायाभूत सुविधांचा आराखडा केवळ कागदापुरताच मर्यादित होता. मात्र, आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाल्याने २३ गावांच्या ‘नैना’च्या पहिल्या टप्प्याचा विकास दृष्टिपथात आला आहे.
‘नैना’ क्षेत्रातील २२४ गावांंतील ४७४ चौरस किलोमीटर परिसरात पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोवर आली आहे. यातील २३ गावांचा समावेश असलेल्या ३७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या प्रारूप विकास आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित २०१ गावांचा विकास आराखडा शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या सिडकोने पहिल्या टप्प्याच्या विकासावर भर दिला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर सिडकोने या क्षेत्रात नगररचना परियोजना अर्थात टीपी स्कीमचा अवलंब केला आहे. त्यापैकी आकुर्ली गाव परिसरातील ५० एकर क्षेत्राच्या पहिल्या टीपी स्कीमच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केल्याने विकासकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, नगररचना परियोजनेला तेथील भूधारकांनी पसंती दर्शविल्यानेच सिडकोने आणखी सात टीपी स्कीमचे नियोजन केले आहे. त्यातील दोन टीपी स्कीम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. एकूणच या तिन्ही टीपी स्कीमवर कार्यवाही सुरू झाल्यास या क्षेत्रात सिडकोच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Naina's pilot project has invited tender for the development phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.