नवी मुंबईत पालिका राबविणार नाला व्हिजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:24 AM2020-03-05T00:24:43+5:302020-03-05T00:24:52+5:30
पावसाचे पाणी वसाहतीमध्ये जाऊ नये, यासाठी दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली आहेत. याशिवाय सर्व होल्डिंग पॉण्डचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.
नवी मुंबई : शहरातील ७८ किलोमीटर लांब ४४ पावसाळी नाल्यांची एकत्रित सुधारणा करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. पावसाचे पाणी वसाहतीमध्ये जाऊ नये, यासाठी दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली आहेत. याशिवाय सर्व होल्डिंग पॉण्डचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.
खाडीचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी सिडकोने ११ ठिकाणी होल्डिंग पॉण्ड (धारण तलाव) तयार केले आहेत. जवळपास २०० हेक्टर क्षेत्रामध्ये हे तलाव असून, ते शहराची संरक्षण भिंत म्हणून ओळखले जातात; परंतु मागील २५ वर्षांमध्ये तलावामधील गाळ काढला नसल्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे. तलावांमध्ये खारफुटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे गाळ काढता येत नाही. काढ काढण्याची परवानगी मिळावी, यासाठी पालिकेने न्यायालयात परवानगी मागितली आहे; परंतु त्याविषयी अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. बुधवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीमध्ये सीबीडीमधील नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी या विषयाकडे लक्ष वेधले. गतवर्षी पावसाळ्यामध्ये अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. ऐरोली, वाशी व इतर ठिकाणीही परिस्थिती गंभीर आहे. महापालिका प्रशासनाने धारण तलावामधील खारफुटी इतर ठिकाणी हलवून त्यांची साफसफाई करावी. त्यासाठी न्यायालयाकडून विशेष परवानगी मिळवावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुढील वर्षी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये शिरले तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. दिव्या गायकवाड, सलुजा सुतार, रवींद्र इथापे यांनीही हा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी होल्डिंग पॉण्ड व पावसाळी नाल्यांची सुधारणा करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर सादर केला असून, तेथे मंजुरी मिळाली की पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळी पाणी वाहून नेणारे एकूण ४४ नाले आहेत. या नाल्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. एमआयडीसीमध्ये बोनसरी परिसरात गतवर्षी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये शिरल्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले होते. यामुळे सर्वच प्रभागांमधील लोकप्रतिनिधींनी नाला व्हिजन राबविण्याची मागणी केली आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात ४४ नाले असून, त्यांची लांबी ७८.२७ किलोमीटर आहे. नाल्यांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी डेब्रिजचे ढिगारे पडले आहेत. यामुळे नाल्यांमधील अडथळे दूर करावे. आवश्यक त्या ठिकाणी गॅबियन वॉल पद्धतीने संरक्षण भिंत तयार करण्याचे प्रस्तावित केले आहे. सर्वसाधारण सभेमध्ये बुधवारी हा विषय मांडण्यात येणार होता; परंतु त्यामध्ये काही सुधारणा करावयाची असल्यामुळे तो पुढील सभेमध्ये सादर करण्यात येणार आहे.
>धारण तलावांची माहिती
नाव क्षेत्र
बेलापूर सेक्टर १२ ५.५
बेलापूर सेक्टर १५ अ १३.८५
वाशी सेक्टर ८अ २.३
वाशी गाव १.९३
वाशी सेक्टर १० अ १५
वाशी सेक्टर १२ २४
नाव क्षेत्र
कोपरखैरणे सेक्टर १४ ०९
ऐरोली सेक्टर १८ १६
ऐरोली सेक्टर १९ १४
वाशी रेल्वे स्टेशन मागे ७७
सानपाडा सेक्टर ३० अ २२
>नाल्याचे नाव लांबी
एमआयडीसी नाला सानपाडा ५,५६०
जिग्ना आॅर्गनिक ब्रांच २१०
हर्डिलीया जवळील नाला १,८३०
जुईनगर रेल्वे स्टेशन १,४३०
चिंचोली तलाव ३२०
वाशी सेक्टर १२ ३,९३४
ब्रांच ६ २,७५०
सेंट्रल नाला १,१०८
वाशी गाव २६०
आर्टिस्ट व्हिलेज २,३५०
आर्टिस्ट नाला ब्रांच ३५०
मँगो गार्डन नाला १,८१०
बेलापूर रेल्वे स्टेशन ९००
नाल्याचे नाव लांबी
टाटा पॉवर ते पामबीच नाला २,५५०
एअर इंडिया कॉलनी नाला ७५०
खैरणे नाला ३,९००
कोपरखैरणे क्रशर ५००
अमर बिटूमेन कंपनीजवळील नाला १,३७५
पाण्याची टाकीजवळील झोपडपट्टी ८५०
कैलाश उद्यान ६००
पावणे नाला १,८००
खैरणे ब्रांच १ ते ४ ७,१४९
नोसील नाला घणसोली ४,२१५
घणसोली ब्रांच १ ते ४ ५,००५
इलठाण पाडा नाला ८५०
सेंच्युरी नाला १,२१०
नाल्याचे नाव व लांबी
भारत बिजली नाला १,५६५
गवतेवाडी नाला ४२०
ऐरोली सेक्टर २० १३०
ऐरोली सेक्टर १४ २३०
महापे नाला १,३६०
पॉयशा नाला १,२००
रिलायबल फॅशन नाला १,५००
कोपरखैरणे नाला सेक्टर २ १,६१०
कोपरखैरणे सेक्टर १३ १,५७०
गोठवली गावाजवळील नाला ८९०
अमृत धाम ७३०
>ऐरोलीमध्येही लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा
ऐरोलीमधील होल्डिंग पॉण्डचीही दुरवस्था झाली आहे. तलावामध्ये गाळ साचला असून खारफुटी वाढली आहे. येथील गाळ काढावा व परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी नगरसेविका संगीता पाटील, अशोक पाटील यांनीहीमहापालिकेकडे केली आहे. यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे; परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही.