झोपडपट्टी परिसरात नालेसफाईचा बोजवारा

By admin | Published: May 8, 2017 06:36 AM2017-05-08T06:36:33+5:302017-05-08T06:36:33+5:30

महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला गती दिली आहे. शहराच्या विविध भागांत नाल्यातील गाळ उपसण्याची मोहीम

Nalaseefa ruin in the slum area | झोपडपट्टी परिसरात नालेसफाईचा बोजवारा

झोपडपट्टी परिसरात नालेसफाईचा बोजवारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला गती दिली आहे. शहराच्या विविध भागांत नाल्यातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे असले तरी झोपडपट्टी परिसरात मात्र अद्यापि, या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर्षीसुद्धा झोपडपट्टी परिसरात या कामाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, कामाच्या दर्जाबाबत कोणतीही खबरदारी बाळगली जात नाही. त्यामुळे ही मान्सूनपूर्व साफसफाईची कामे म्हणजे केवळ औपचारिकता ठरल्याचे दिसून आले आहे. शहरी भागात ठिकठिकाणी नाल्यातील गाळ उपसून तो पदपथांवर गोळा करण्यात आला आहे. काही भागांतील कामे पूर्ण झाली आहेत. तर काही ठिकाणी अद्यापि गाळ उपसण्याची कामे सुरू आहेत; परंतु झोपडपट्टी परिसरात अद्यापि कामाला सुरुवातच करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या परिसरात अगोदरच कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. नाले,गटारात प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, बीअरच्या बाटल्या आदी घनकचरा साचला आहे. या परिसरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणा अपुऱ्या आहेत. मलनि:सारण वाहिन्या केवळ नावालाच आहेत. बहुतांशी ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्यात मलवाहिन्या सोडल्या आहेत. एकूणच या वसाहतीतील रहिवाशांनी १२ महिने दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक गंभीर बनते. त्यामुळे पावसाळ्याअगोदर नालेसफाईची कामे होणे गरजेचे असल्याचे रहिवाशांचे मत आहे; परंतु प्रत्येक वर्षी झोपडपट्टी परिसरातील नालेसफाईच्या कामांना प्रशासनाकडून दुय्यम दर्जा दिला जात असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ व ५मध्ये सध्या दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. गणपतीपाडा येथील रेल्वे मार्गालगत असणारे नाले पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. तसेच इलठाणपाडा, सुभाषनगर, कन्हैयानगर आदी भागांतील नाल्यांची दुरवस्था झाली आहे.
दरम्यान, नालेसफाईला लवकरच सुरुवात केली जाईल, असे दिघा विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

झोपडपट्टी परिसरात अद्यापि, नालेसफाईची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. शेवटच्या क्षणी घाईघाईत ही कामे उरकण्याचा प्रयत्न केला जाईल. विशेष म्हणजे, दैनंदिन साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारांवरच नालेसफाईची जबाबदारी टाकली जाते. त्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही. याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसणार आहे.
- जगदीश गवते,
नगरसेवक (प्रभाग क्रमांक ५)

Web Title: Nalaseefa ruin in the slum area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.