नालेसफाईवर नगरसेवक नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 02:42 AM2018-05-20T02:42:28+5:302018-05-20T02:42:28+5:30
स्थायी समितीमध्ये पडसाद : दिघासह घणसोली परिसरातील स्थिती गंभीर
नवी मुंबई : पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाचे तीव्र पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. एमआयडीसी, गावठाण, घणसोलीसह दिघा परिसरामध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यात आला नाही. अशीच स्थिती राहिली तर पावसाळ्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही नगरसेवकांनी दिला.
नवी मुंबई महानगरपालिकेने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. महापौर जयवंत सुतार, आयुक्त रामास्वामी एन. यांनी विभागनिहाय नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आहे. यानंतरही अनेक ठिकाणी समाधानकारक कामे झालेली नाहीत. स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. शहरात वृक्षछाटणीची कामे वेळेवर होत नाहीत. नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतरही कर्मचारी वेळेवर येत नाहीत. १० वाजल्यानंतर वृक्षछाटणी कर्मचाºयांचे काम सुरू होत असून अनेक ठिकाणी धोकादायक असलेल्या फांद्या काढण्यात आलेल्या नाहीत. शहरातील होल्डिंग पाँडची साफसफाई केली जात नाही. त्यामधील गाळ जैसे थे असून, त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.
दिघा परिसरामध्ये नालेसफाईची कामे सुरूच झाली नसल्याबद्दल नवीन गवते यांनी लक्ष वेधले. दिघा परिसरावर नेहमीच अन्याय होत आहे. दोन महिन्यांपासून विभाग अधिकारी नाही. नागरिकांनी तक्रारी करायच्या कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या नाल्यांमध्ये गाळ साचला असून तो काढला जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. घणसोलीमध्ये अनेक ठिकाणी गटारेच अस्तित्वात नाहीत. तेथील कामे समाधानकारक नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. अनेक ठेकेदार गटाराच्या झाकणाजवळीलच गाळ काढत आहेत. पूर्ण गटारांची साफसफाई केली जात नाही. ठेकेदाराने काम व्यवस्थित केले आहे का, याची पाहणी करावी व निष्काळजीपणा करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी नगरसेवकांनी केली. सर्वसाधारण सभेमध्ये आपत्ती व्यवस्थापनावर लक्षवेधी घेतली असती, तर सर्व १११ नगरसेवकांनी त्यांची व्यथा मांडली असती. प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणीही केली.
नगरसेवकांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या परिसरामध्ये नालेसफाईची कामे रखडली आहेत, तेथे विशेष लक्ष द्यावे. दिघा, घणसोली, एमआयडीसी परिसरासह सर्व ठिकाणची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी.
- सुरेश कुलकर्णी,सभापती स्थायी समिती
ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमधील स्थिती बिकट झाली आहे. आरोग्य चांगले राहावे, यासाठी नागरिक तेथे व्यायामासाठी जातात; पण दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
- सुनील पाटील,नगरसेवक प्रभाग ९२
२५ मे पूर्वी कामे पूर्ण होणार
घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार यांनी, पावसाळापूर्व नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. दिघा व इतर ठिकाणच्या सहा नाल्यांचे काम निविदा प्रक्रियेमुळे रखडले होते. ती कामेही पूर्ण झाली आहेत. सर्व कामे २५ मेपूर्वी पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.