अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीकामोठे वसाहतीत ११ ते १३ हे तीन प्रभाग आहेत. निवडणुकांमुळे सध्या प्रभागात प्रचाराला वेग आला असला तरी याठिकाणी पिण्याचे पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, गटार आदी समस्या गंभीर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वसाहतीला या समस्या भेडसावत असल्या तरी याबाबत योग्य उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळेच नाव मोठे नि लक्षण खोटे अशी स्थिती वरील तीनही प्रभागात दिसून येते. सिडकोने या वसाहतीबाबत कायम दुजाभाव केला आहे. महापालिका झाल्याने आतातरी समस्या सुटतील अशी अपेक्षा स्थानिकांना आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून येणाऱ्या उमेदवारांना स्थानिकांच्या अपेक्षा पूर्तीकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. एका बाजूला पनवेल - सायन महामार्ग आणि दुसऱ्या बाजूला मानसरोवर व खांदेश्वर रेल्वेस्थानक यामुळे कामोठे वसाहतीला चाकरमान्यांकडून विशेष पसंती दिली जाते. या ठिकाणी घर घेणाऱ्यांबरोबरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून नोकरी-व्यवसायानिमित्त आलेले अनेक कुटुंब या तीनही प्रभागात स्थायिक झालेले आहेत. या व्यतिरिक्त गुजराती आणि राजस्थानी लोकांची संख्याही मोठी आहे. स्थानिक आगरी, कराडी आणि कोळी समाजाचे लोकही मोठ्या प्रमाणात कामोठे वसाहतीत वास्तव्यास आहेत. वसाहतीतील पाणीप्रश्न अजूनही सुटलेला नाही. याचे कारण नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणावर कामोठेकरांना अवलंबून राहावे लागते. मात्र मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी कामोठे वसाहतीत दिवसाआड पाणी दिले जात होते. आता परिस्थिती काहीशी बरी असली तरी इतर वसाहतीप्रमाणे तीनही प्रभागात मुबलक पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांत योग्य देखभाल न झाल्याने पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होते. पावसाळी नाल्यांची साफसफाईही ठेकेदार करीत नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात आल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथावर अतिक्रमण केल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी एनएमएमटी सुरू केली असली तरी फेऱ्या अपुऱ्या आहेत. बायोमेडिकल वेस्ट बिनधास्तपणे मोकळ्या जागेवर टाकले जात असल्याने रहिवाशांच्या आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचऱ्याची समस्या नित्याचीच असून सिडकोकडून औषध फवारणी नियमित केली जात नाही, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकही हैराण झाले आहेत.तीनही प्रभागात बीअर शॉपी, बारची संख्या मोठी आहे. पाचशे मीटर अंतरामुळे काही बार बंद झाले असले तरी त्याठिकाणी चोरून दारू विक्र ी होते. येथील काही बार मालकाने थेट इमारतीची स्टील्ट पार्किंग अडवून तिथे किचन टाकले आहे. याविरोधात रहिवाशांनी पाठपुरावा करूनही त्यांना सिडको, पोलीस यंत्रणा दाद देत नाही.दोन कि.मी.चा वळसाकामोठे वसाहतीलगत पनवेल - सायन महामार्गाचे सर्व्हिस रोडचे काम रखडले आहे. त्यामुळे रहिवाशांना मुंबईकडे जाण्याकरिता थेट कळंबोलीला वळसा घालावा लागतो. याबाबत वारंवार आंदोलने, तसेच पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली निघालेला नाही.
नाव मोठे... लक्षण खोटे...
By admin | Published: May 05, 2017 6:17 AM