पनवेल : मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे या विमानतळाचे नावसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असेच राहील, असे प्रतिपादन केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते यांनी केले आहे. पनवेल येथील एका कार्यक्रमात बोलताना गीते यांनी ही माहिती दिली. नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सध्या चळवळ जोम धरत आहे. अशातच केंद्रीय मंत्र्यांनी उपरोक्त वक्तव्य केल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नाराजी प्रकट केली आहे.मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळाची निर्मिती होत आहे. राज्य शासन आणि सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या विमानतळावर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थलांतरित करण्यात येईल. तसेच मुंबई विमानतळाची सेवा देशांतर्गत राहील. त्यामुळे त्या विमानतळाचे नाव इथल्या विमानतळाला कायम राहील, असे सांगत त्यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाला नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल घेत विमानतळ नामकरण समितीपुढे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हात्रे यांना कळविले आहे. यातच केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते यांनी या विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असेच राहील, असे ठामपणे सांगितल्याने नामकरणावरून प्रकल्पग्रस्तांत संभ्रम निर्माण झाला आहे. पनवेलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे, आ. धैर्यशील पाटील, आ. सुरेश लाड, आ. मनोहर भोईर, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत पाटील, आ. बाळाराम पाटील, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हात्रे आदी उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव - गिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:27 AM