मृत्यू दाखल्यावरून वारसाचे नाव गायब, नवी मुंबई महापालिकेचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 12:23 AM2020-09-04T00:23:37+5:302020-09-04T00:24:06+5:30
कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच यंत्रणा कोलमडल्या आहेत. विशेषत: आरोग्य विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. महापालिकेच्या बहुतांशी विभागाचा कारभार ठप्प आहे. कोविडमुळे धास्तावलेल्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य चुका होत आहेत.
नवी मुंबई : मृतदेहांची अदलाबदल, जीवंत माणसाला मृत्यू घोषित करणे अशा प्रकारानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने आता मृत्यू दाखल्यावरून वारसदारांची नावेच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात विचारणा करायला गेलेल्या नातेवाइकांना संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरेसुद्धा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच यंत्रणा कोलमडल्या आहेत. विशेषत: आरोग्य विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. महापालिकेच्या बहुतांशी विभागाचा कारभार ठप्प आहे. केवळ आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित विभागाचे कामकाज सुरू आहे. कोविडमुळे धास्तावलेल्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य चुका होत आहेत.
तुर्भे सेक्टर २१ येथील प्रदीप गायकवाड या तरुणाचा २0 मे २0२0 रोजी मलेरियामुळे महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची कोविड चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यविधीच्या काही दिवसांनंतर प्रदीपच्या नातेवाइकांनी मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयात अर्ज केला.
परंतु रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या कागदपत्रांवर मृतांच्या वारसांचा नामोल्लेख नसल्याने मृत्यू दाखल्यावर वारसदारांची नावे टाकता येणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. तसेच रुग्णालयाने लिहून दिल्यास वारसदारांच्या नावांचा समावेश करता येईल, असेही विभाग कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात
आले.
त्यानुसार मृताच्या नातेवाइकांनी रुग्णालयातून वारसदारांची नावे समाविष्ट करण्याबाबतचे लिखित पत्रही आणले. परंतु त्यानंतरसुद्धा मृत्यू दाखल्यात वारसांची नावे समाविष्ट करणे नियमाने शक्य नसल्याचे नातेवाइकांना सांगण्यात
आले.
प्रदीप गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, चार महिन्यांची मुलगी आणि आई असा परिवार आहे. प्रदीप हा एकटा कमविणारा होता. त्याच्या मृत्यूनंतर तो नोकरी करीत असलेल्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्याच्या पत्नीला संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी वारसदारांच्या नावासह पतीच्या मृत्यू दाखल्याची गरज आहे. पतीच्या निधनानंतर त्याची पत्नीच खरी वारसदार असते. असे असतानाही मृत्यू दाखल्यात मयत प्रदीप गायकवाड याच्या वारसांच्या नावांचा समावेश करण्याबाबत संबंधित विभाग चालढकल करीत असल्याचा आरोप प्रदीपचे काका भास्कर गायकवाड यांनी केला आहे.