मॅरेथॉनच्या नावाखाली स्पर्धकांची लुबाडणूक, विजेत्यांना बक्षिसाची रक्कम नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:31 AM2019-10-03T03:31:05+5:302019-10-03T03:31:19+5:30
स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली वाशीत झालेल्या मॅरेथॉनच्या माध्यमातून स्पर्धकांची लुबाडणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली वाशीत झालेल्या मॅरेथॉनच्या माध्यमातून स्पर्धकांची लुबाडणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या स्पर्धेत तीन गटांमध्ये मिळून दोन लाखांची पारितोषिके घोषित करण्यात आली होती. त्यानुसार स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांकडून ४५० रुपयांपासून ते १३०० रुपयांपर्यंतचे प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र विजेत्यांना पुरस्काराची रक्कम न देता चषक देऊन समाधान मानायला लावल्याचा प्रकार घडला.
वाशीत स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश देण्यासाठी बुधवारी वाशीत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. २१, १०, ५ व ३ कि.मी. अंतर अशा चार गटांमध्ये ही मॅरेथॉन झाली. त्यापैकी तीन कि.मी. अंतराचा गट वगळता उर्वरित तीनही गटांतील पहिल्या तीन विजेत्यांना एकून दोन लाखांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. त्यानुसार स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांकडून प्रत्येकी १,२९९, १,०९९, ६४९ व ४४९ रुपये इतके प्रवेश शुल्क आकारले होते. त्यानुसार नवी मुंबईसह मुंबई व ठाणे परिसरातून सुमारे साडेतीन ते चार हजार स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. अॅक्सॉम स्पोर्ट्स व इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून आयोजित या मॅरेथॉनसाठी अनेक व्यावसायिक संस्थांनीही प्रायोजकत्व केले होते. या वेळी पालिका अधिकाऱ्यांसह आयोजक व प्रायोजक उपस्थित होते.
प्रत्यक्षात मात्र बुधवारी सकाळी पामबीच मार्गावर ही मॅरेथॉन झाली असता, अनेकांनी बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या उद्देशाने धाव घेऊन पदरी यश पाडले. या विजेत्यांमध्ये आदिवासी पाड्यातील गरीब कुटुंबातील तरुण-तरुणींसह नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र, बक्षीस समारंभप्रसंगी या विजेत्यांची केवळ चषक देऊन फसवणूक करण्यात आली. या वेळी त्यांनी आयोजकांकडे बक्षिसाच्या रकमेबाबत चौकशी केली असता, त्यांना उडवाउडवीचे उत्तर मिळाले. त्यामुळे स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांनी मॅरेथॉन संपताच वाशी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली. त्याशिवाय सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांचीही भेट घेऊन आयोजकांवर कारवाईची मागणी केली. त्यानुसार वाशी पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी केली जात आहे. मात्र, यासंदर्भात अॅक्सॉम कंपनीच्या संबंधित व्यक्तींशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पामबीच मार्गावर झालेली ही मॅरेथॉन २१, १०, ५ व ३ कि.मी. अंतर अशा चार गटांत झाली. स्पर्धकांकडून प्रत्येक गटासाठी अनुक्रमे १,२९९, १,०९९, ६४९ व ४४९ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले, त्यानुसार स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे साडेतीन ते चार हजार स्पर्धकांच्या माध्यमातून आयोजकांनी ५० लाखांहून अधिक रकमेचा अपहार केल्याचा आरोप स्पर्धकांकडून होत आहे.
मॅरेथॉनच्या तीन गटातून एकूण दोन लाखांचे बक्षीस मिळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार १,२९९ रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभाग घेतला होता. या वेळी २१ कि.मी. अंतराच्या गटातून दुसरा क्रमांक मिळवला. मात्र, आयोजकांकडून बक्षिसाची रक्कम देण्यास नकार दिला. यामुळे झालेल्या फसवणुकीची वाशी पोलिसांकडे तक्रार केली असून, संबंधितांवर कारवाईची अपेक्षा आहे.
- दिनेश म्हात्रे,
विक्रमगड (विजेता स्पर्धक)