नवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य रचनेची पायाभरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाली होती. नवी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठी ते नेहमीच आग्रही असल्याने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयास त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. इंदिरानगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी याविषयी पत्र महापौर, आयुक्त, विरोधीपक्षनेते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिले आहे. नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. मुंबई, ठाणेप्रमाणे नवी मुंबईवरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष लक्ष होते. शहरवासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी त्रिस्तरीय आरोग्य यंत्रणा उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय हे मुख्य रुग्णालय उभारण्यात आले. या ठिकाणी भूखंड त्यांनीच मिळवून दिला. १३ मे १९९७मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते रुग्णालयाची पायाभरणी झाली. वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबईमधील आरोग्याविषयी व साथीच्या आजारांविषयी बातम्या आल्यानंतर त्यांनी तत्कालीन महापौरांना मातोश्रीवर बोलावून वर्तमानत्रांमधील बातम्या दाखवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या होत्या. यामुळे प्रथम संदर्भ रुग्णालयास त्यांचे नाव देण्यात यावे असा उल्लेख पत्रामध्ये केला आहे. नवी मुंबईकरांच्या आरोग्याविषयी काळजी घेणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचे नाव प्रथम संदर्भ रुग्णालयास योग्य होईल. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने हा निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. प्रभाग समित्या गठित झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत नामकरणाचा ठराव मंजूर करावा, अशी मागणीही महेश कोठीवाले यांनी केली आहे.
प्रथम संदर्भ रूग्णालयास शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या
By admin | Published: March 26, 2017 5:21 AM