- मधुकर ठाकूर
उरण : शेतकरी, प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्र यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त संघटनांनी एकजूट होऊन संघर्ष करण्याचे आवाहन नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटील यांनी शनिवारी (६) जासईत महासंघाच्या स्थापनेसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केले. नवी मुंबई सिडको, जेएनपीए आणि इतर विविध प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी नव्याने नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. याआधीच प्रकल्पग्रस्तांच्या अनेक संघटना आहेत.यामध्ये आता नव्याने या संघटनेची भर पडली आहे. नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाची शनिवारी (६) जासई येथील दिबांच्या स्मारक सभागृहात बैठक झाली.
या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महासंघाच्या वतीने पुढील काळातील आंदोलनाची घोषणा करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबांच्या नावाची घोषणा करण्याचीही मागणी महासंघाच्या वतीने यावेळी करण्यात आली. शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यावर महासंघअंतर्गत संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस देण्यात आली आहे.
यामध्ये २० फेब्रुवारी रोजी सिडको भवन समोर नवी मुंबई प्रकल्पग्रस्त ९५ गावांचे महाधरणे आंदोलन, ४ ते १६ मार्चला सिडको भवन येथे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तर १७ मार्च या सिडकोच्या स्थापना दिनी सिडको भवन ते मंत्रालय पर्यंत लॉंगमार्च काढण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटील यांनी दिली. याप्रसंगी महासंघाचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, सरचिटणीस सुधाकर पाटील, उपाध्यक्ष ॲड. विजय गडगे, समन्वयक ॲड. दीपक ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील,वंदना गौरीकर आदी उपस्थित होते.