स्वातंत्र्य सैनिकांचा नामफलक गायब; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीरांच्या नावाचा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 01:21 PM2023-08-15T13:21:36+5:302023-08-15T13:22:20+5:30

चबुतरे किंवा नामफलक उभारण्यात महापालिकेला विसर पडला आहे. 

nameplate of freedom fighters missing forget the name of the brave heroes who gave freedom to the country | स्वातंत्र्य सैनिकांचा नामफलक गायब; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीरांच्या नावाचा विसर!

स्वातंत्र्य सैनिकांचा नामफलक गायब; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीरांच्या नावाचा विसर!

googlenewsNext

अनंत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्यात खारीचा वाटा असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे गाव अशी घणसोली गावची ओळख आजही कायम आहे. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या गावात आता स्वातंत्र्य सैनिक एकही हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्या रक्तरंजित आंदोलन आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून नवी मुंबई महापालिकेने २००१- २००२ साली स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचे विविध चौकांमध्ये नामफलक लावले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे यातील अनेक नामफलक गायब झाले आहेत. त्यांचे चबुतरे किंवा नामफलक उभारण्यात महापालिकेला विसर पडला आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नवी मुंबईतील घणसोली गावच्या बालवयातील सैनिकांनी ब्रिटिशांविरोधात वानर सेनेने पहिले आंदोलन सुरू केले. घणसोलीत १९  डिसेंबर १९२९ रोजी छावणीची स्थापना झाली. ब्रिटिश सरकारविरोधात ३० जानेवारी १९३० रोजी आंदोलनाला सुरुवात झाली. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन झाले. यात घणसोलीगावचे रामा दिवड्या रानकर, चाहु आंबो पाटील, शंकरबुवा शिनवार पाटील, वामन पदा पाटील, वाल्मीक महादू पाटील, नारायण मरोजी मढवी, वाळक्या उंदऱ्या पाटील, जोमा पदा पाटील, परशुराम पदा पाटील, हाल्या हिरा म्हात्रे, रघुनाथ पवार, सीताराम पवार, दाजी लक्ष्मण गायकर यांच्यासह २५  ते ३०  सत्याग्रही तरुणांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. मीठ हातात घेऊन ब्रिटिश सरकारच्या विरोधात घोषणा देत असताना पोलिसांनी लाठीमार सुरू केला. मात्र, आता स्वातंत्र्य सैनिक स्व. शंकरबुवा शिनवार पाटील यांचा अपवाद वगळता इतर स्वातंत्र्य सैनिकांचे नामफलक किंवा जे चबुतरे अस्तित्वात आहेत, त्यांची पार दुरवस्था झाली आहे. घणसोली (चिंचआळी) येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. नारायण मरोजी मढवी यांच्या नावाची पाटी त्यांच्या वारसांनी स्वखर्चाने बनवून लावलेली आहे.

घणसोलीतील सत्याग्रह छावणीला डॉ. राजेंद्र प्रसाद, साने गुरुजी, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, कमलादेवी चटोपाध्याय, जमनालाल बजाज आदी राष्ट्रीय नेत्यांनी भेटी दिल्या होत्या. स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकाच्या पाट्या गायब झाल्याने आमदार गणेश नाईक आणि महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना घणसोली ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे माजी शिक्षण समिती उपसभापती मोहन म्हात्रे यांनी दिली.

बेछूट लाठीमार

- पहिला सत्याग्रह १४ जानेवारी १९३०, दुसरा १३ एप्रिल १९३० रोजी सानपाडा येथील सोनखाडीतून मीठ झाला. यात सत्याग्रही ठाण्याच्या दिशेने जात असताना बोनकोडे येथे पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यात गोठीवली गावचे कान्हा म्हात्रे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने कायमचे अपंगत्व आले. तिसरा ८ मे १९३० आणि १ जानेवारी १९३१ रोजी झालेल्या विलेपार्ले आणि घाटकोपरच्या परिषदेत स्वयंसेवकाची भूमिका बजावताना घणसोली गावच्या अनेक सत्याग्रहींना तुरुंगात डांबले.

 

Web Title: nameplate of freedom fighters missing forget the name of the brave heroes who gave freedom to the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.