नवी मुंबई : तुर्भे येथे सायन-पनवेल मार्गावर तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रशासनाविरोधात सोमवारी मनसेने आंदोलन केले. यावेळी रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांना मंत्र्यांची नावे देवून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महामार्गावर घडलेल्या अपघातांच्या घटनांप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी देखील करण्यात आली.प्रतिवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची चाळण होत आहे. अशातच सायन-पनवेल मार्गाला व ठाणे-बेलापूर मार्गाला जोडणाºया तुर्भे येथील भागात सर्वाधिक खड्डे पडले आहेत. सर्व्हिस रोड देखील खड्ड्यांमुळे जलमय होत आहे. परिणामी सदर दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होत असून वाहन चालकांसह प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदर ठिकाणी सुमारे ५०० ते ६०० मीटरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यास तिथल्या खड्ड्यांचा प्रश्न कायमचा मिटू शकतो. त्यानुसार यासंदर्भात अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखील पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु संबंधित सर्वच प्रशासकीय यंत्रणेकडून तिथल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे खड्ड्यांमधून वाहन चालवताना चालकांना कराव्या लागत असलेल्या कसरतीमुळे वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागतआहे.त्यामुळे प्रतिवर्षी त्याठिकाणी पडणाºया खड्ड्यांची समस्या कायमची सोडवली जावी याकरिता मनसेतर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रवीण पोटे, मंत्री चंद्रकांत पाटील यांची नावे देण्यात आली. तसेच खड्ड्यांवरून लांब उडीची स्पर्धा घेवून विजेत्यांना युती सरकारच्या निषेधार्थ धनुष्य व कमळ बक्षीस देण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुरवस्थेप्रकरणी भाजपाचे खासदार संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याचीही मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली. याप्रसंगी नीलेश बाणखेले, संदीप गलुगडे, अनिथा नायडू, श्रीकांत माने, अप्पासाहेब कोठुळे, सविनय म्हात्रे, नितीन चव्हाण, संदेश डोंगरे, नितीन नाईक, शीतल मोरे, दीपाली दमणे, विलास घोणे यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आंदोलनादरम्यान मनसैनिकांकडून रास्ता रोको होण्याची शक्यता होती. यामुळे तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई, सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज पाडवी यांनी उपस्थित राहून आंदोलकांवर नियंत्रण मिळवले.यादरम्यान परिसरात वाहतूक शाखेसह दोन्ही पोलीस ठाण्याच्या पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.एनएमएमटीला दे धक्कामनसेच्या आंदोलनादरम्यान रस्त्याच्या एका बाजूने चाललेली एनएमएमटीची बस बंद पडली. खड्ड्यामधून चालक मार्ग काढत असतानाच हा प्रकार घडला. यामुळे सतत बसमध्ये बिघाड होत असल्याने एनएमएमटी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढत मनसैनिकांनी धक्का देवून बंद पडलेली बस मार्गातून हटवून रस्त्यालगत नेवून उभी केली.
महामार्गावरील खड्ड्यांना मंत्र्यांची नावे, मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:27 AM