पनवेलमध्ये शासकीय वास्तूंना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 02:23 AM2019-09-06T02:23:06+5:302019-09-06T02:23:59+5:30
आयुक्तांचा निर्णय : संकल्पना राबविणारी पहिलीच महापालिका; ‘स्वराज्य’ नावाने ओळखले जाणार पालिका मुख्यालय
वैभव गायकर
पनवेल : पनवेल महापालिकेच्या विविध वास्तूंना ऐतिहासिक नावे देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला आहे. अशा प्रकारची संकल्पना राबवणारी पनवेल महानगरपालिका ही राज्यातील पाहिलीच महानगरपालिका ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांच्या बंगल्यांना विविध नावाने ओळखले जाते. त्याच धर्तीवर पनवेल महापालिकेचे मुख्यालय, आयुक्त निवास, महापौर निवास तसेच प्रभाग कार्यालये भविष्यात ओळखली जाणार आहेत.
रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असून, पनवेल महापालिका जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने पालिकेच्या महत्त्वाच्या वास्तूंना ऐतिहासिक नावे देण्याची संकल्पना आयुक्त गणेश देशमुख यांनी राबविली आहे. यापूर्वी कृषी विद्यापीठामार्फत अशी अनेखी संकल्पना राबविण्यात आली असून, कृषी विद्यापीठांतर्गत उभारण्यात आलेल्या वसतिगृहांना ऋतूंची नावे देण्यात आली आहेत. याच धर्तीवर पनवेल महापालिकेच्या वास्तूंची ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पनवेल महापालिकेच्या मुख्यालयाला ‘स्वराज्य’ नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात रायगडला स्वराज्याच्या राजधानीचे स्थान देण्यात आले होते. त्याच धर्तीवर पनवेल महापालिकेचे मुख्यालय हे स्वराज्य मुख्यालय म्हणून भविष्यात ओळखले जाणार आहे. याच प्रकारे महापौर बंगल्याला ‘शिवनेरी’ तर आयुक्त बंगल्याला ‘राजगड’ हे नाव देण्यात आले आहे. पालिकेचे प्रभागनिहाय कामकाज ज्या प्रभाग कार्यालयातून चालते, त्या पालिकेच्या अ, ब, क, ड या चार प्रभाग कार्यालयांना विजयदुर्ग, जलदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग आदी नावे देण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता भावी पिढीला आपला अमूल्य इतिहास लक्षात राहावा, या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.
रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पनवेल शहर हा रायगड जिल्ह्याचा अविभाज्य घटक आहे. हे लक्षात घेता ही संकल्पना राबविण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाने त्यांच्या वसतिगृहांना ऋतूची नावे दिली आहेत. त्याच आधारावर पनवेल महानगरपालिकेच्या वास्तूंना किल्ल्यांची नावे देण्याची संकल्पना राबविली आहे.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महानगरपालिका
पनवेल महापालिकेची संकल्पना खरोखरच स्तुत्य आहे. भावी पिढीला गड, किल्ले यांचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. पालिकेच्या वास्तूंना अशाप्रकारे ऐतिहासिक नावे दिल्यास भावी पिढी इतिहासाबद्दल नक्कीच विचार करेल.
- चेतन डाऊर,
इतिहास संशोधक, पनवेल
महानगरपालिकेच्या वास्तूंना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्याची संकल्पना अतिशय स्तुत्य आहे. या विषयावर अभ्यास करण्यासाठी आम्ही वेळ घेतला आहे, तोपर्यंत विषय स्थगित ठेवला असला तरी पुढील सभेत या विषयाला मंजुरी देण्यात येईल.
- परेश ठाकूर,
सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका