जिवंत नसणाऱ्यांची नावेही मतदार यादीमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:53 AM2018-04-26T03:53:26+5:302018-04-26T03:53:26+5:30
२०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघामध्ये अटीतटीची लढत झाली होती.
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ सुरू आहे. १४ हजार नागरिकांची दुबार नावे असून, जिवंत नसलेल्या २५ हजार नागरिकांचे नाव मतदारयादीमध्ये असल्याचे निदर्शनास आले असून याविषयी शिवसेनेने आवाज उठविला आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघामध्ये अटीतटीची लढत झाली होती. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या मतदार संघामध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक मताला महत्त्व असल्यामुळे मतदार नोंदणीबरोबर बोगस मतदारांची नावे कमी करण्यावरही भर दिला जात आहे. शिवसेनेने महापालिकेच्या वार्डनिहाय याद्यांची छाननी करण्यास सुरुवात केली असून शहरामध्ये तब्बल १४ हजार मतदारांची दोन वेळा नावे आली असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय शहरात यापूर्वी मृत्यू झालेल्या २५ हजार नागरिकांची नावे मतदार यादीमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, ज्ञानेश्वर सुतार, विशाल ससाणे, सरोज पाटील, रोहिदास पाटील, समीर बागवान यांनी सहायक आयुक्त तुषार मटकर यांची भेट घेतली. दुबार नावे तत्काळ वगळण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी शिवसेनेने दिला. मतदार याद्यांमधील घोळ सुधारण्याचे आश्वासन या वेळी तुषार मटकर यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.