नवी मुंबई : 'नमो चषक 2024' चा शुभारंभ ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते जल्लोषात झाला. विविध कला आणि क्रीडा प्रकारातील स्पर्धांमध्ये 60 हजार विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर भव्य चित्रकला स्पर्धेने नमो चषकाची सुरुवात झाली. या चित्रकला स्पर्धेमध्ये तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला आपले विचार आणि संकल्पना रंगांच्या माध्यमातून कलात्मक पद्धतीने या विद्यार्थ्यांनी रेखाटल्या. याशिवाय नमो चषक स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, म्यारेथॉन, सायकलिंग, नृत्य, वक्तृत्व, बुद्धिबळ, निबंध अशा विविध प्रकारातील 10 क्रीडा आणि 7 प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार गणेश नाईक यांनी भविष्यकाळ हा युवकांचा असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी युवा वर्गाला प्रोत्साहित करण्याचे काम करीत असल्याचे नमूद केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हास्तरावर नमो चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. नमो चषकाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना आणि कलाकारांना संधी मिळणार असून गुणवंतांना राज्य आणि देश स्तरावर देखील कामगिरी करण्याची संधी प्राप्त होवो, अशी सदिच्छा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केली. नवी मुंबई भाजपा जिल्हा आणि नवी मुंबई भाजपा युवा मोर्चा यांच्यावतीने नमो चषकाचे आयोजन केले असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नवी मुंबई भाजपा युवा मोर्चा प्रमुख अमित मेढकर यांनी केले आहे. याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, महामंत्री अनंत सुतार, शशिकांत राऊत, महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी उपस्थित होते.