पोलिसांच्या प्रयत्नामुळे ‘नांदा सौख्य भरे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:17 AM2020-01-08T01:17:11+5:302020-01-08T01:17:14+5:30

किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमधील वादाची प्रकरणे वाढत आहेत.

'Nanda Sakhi Bhak' filled with police efforts | पोलिसांच्या प्रयत्नामुळे ‘नांदा सौख्य भरे’

पोलिसांच्या प्रयत्नामुळे ‘नांदा सौख्य भरे’

Next

सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमधील वादाची प्रकरणे वाढत आहेत. या वादातून घटस्फोटाचे पाऊल उचलले जात आहे; परंतु अशा टोकाच्या निर्णयापर्यंत गेलेल्या २८४ संसाराचा घटस्फोट पोलिसांच्या प्रयत्नामुळे टळला आहे. महिला साहाय्य कक्षाने पती-पत्नीमधील वादाचे कारण शोधून सामंजस्याने त्यावर तोडगा काढून त्यांच्या संसाराचा गाढा रुळावर आणला आहे.
विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे हल्ली लग्नानंतर बहुतांश दाम्पत्ये स्वतंत्र राहताना दिसत आहेत. मात्र, लग्नानंतर काहीच दिवसात त्यापैकी अनेकांमध्ये किरकोळ वादाला सुरुवात झाल्यानंतर त्यातून टोकाची भूमिका घेत घटस्फोट घेऊन वेगळे होण्यावर भर दिला जात आहे; परंतु अशा दाम्पत्यांची समजूत काढून त्यांचे संसार टिकवण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिसांकडून होत आहे. त्याकरिता गुन्हे शाखेचे महिला साहाय्य कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत. गतवर्षात पती-पत्नीमधील वादाच्या ९२१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
आपसातील किरकोळ वाद, गैरसमज तसेच भविष्यातील नियोजन आदी त्यांच्यातील वादाची कारणे आहेत; परंतु त्यांची समजूत काढण्यात दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना फारसे यश येत नाही. त्यामुळे वेगळे होण्यातच दोघांचेही हित असल्याच्या निर्णयावर ते पोहोचत असल्याने, त्यांच्याकडून घटस्फोटासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे पती-पत्नीमधील वादाची तक्रार प्राप्त होताच त्यांच्यातील वादाचे नेमके कारण समजून कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यावर तोडगा काढण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून महिला साहाय्य कक्षाकडून होत आहे. त्यानुसार गतवर्षात प्राप्त झालेल्या ९२१ तक्रारींपैकी ८२९ प्रकरणे पोलिसांनी निकाली काढली असून त्यापैकी २८४ प्रकरणात संभाव्य काडीमोड पोलिसांच्या प्रयत्नामुळे टळला आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे व त्यांच्या पथकाने तक्रारदारांचे प्रबोधन करून हे यश मिळवले आहे. तर ५४७ प्रकरणात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे.
मागील पाच वर्षांत पती-पत्नी यांच्यातील वादातून पोलिसांकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यानुसार मागील नऊ वर्षांत ४,३६८ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १,३२१ दाम्पत्यांचा संभाव्य काडीमोड टाळण्यात गुन्हे शाखा पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षाला यश आले आहे. त्याकरिता पती-पत्नी यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचेही समुपदेशन पोलिसांना करावे लागले. पोलिसांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे त्यांच्यात किरकोळ कारणावरून झालेला दुरावा संपुष्टात येऊन संसाराचा गाढा रुळावर आला आहे.
>आपसातील किरकोळ वादातून अनेक दाम्पत्य घटस्फोटासारख्या टोकाच्या निर्णयाकडे पोहोचतात; परंतु तत्पूर्वी त्यांच्यातील गैरसमज दूर करून पुन्हा संसार थाटता यावेत, याची एक संधी महिला साहाय्य कक्षामार्फत देण्याचा प्रयत्न असतो. त्यानुसार गतवर्षात पती-पत्नीकडून एकमेकांविरोधातल्या ९२१ तक्रारींपैकी २८४ दाम्पत्यांमधील गैरसमज दूर करण्यात आले आहेत. यामुळे त्यांचे घटस्फोट टळले असून त्यांच्या संसाराचा गाढा रुळावर आला आहे.
- प्रवीणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा
गैरसमज, आपसातील किरकोळ वाद, तसेच भविष्यातील नियोजन आदी कारणामुळे वाद वाढत आहेत. गतवर्षात ९२१ तक्रारींपैकी ८२९ प्रकरणे पोलिसांनी निकाली काढली असून २८४ प्रकरणात समझोता करण्यात आला आहे.
>वर्ष प्राप्त तक्रारी निर्गती समझोता निकाल
२०१५ ४९२ ४९२ १७२ ३१८
२०१६ ४८४ ४८४ १३९ ३४५
२०१७ ६०४ ६०४ १४२ ४२९
२०१८ ७७५ ७७५ २२४ ५५१
२०१९ ९२१ ८२९ २८४ ५४७

Web Title: 'Nanda Sakhi Bhak' filled with police efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.