नैनाच्या विकास आराखड्याला आठवडाभरात मंजुरी?
By Admin | Published: March 30, 2016 01:51 AM2016-03-30T01:51:30+5:302016-03-30T01:51:30+5:30
नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याच्या विकास आराखड्याला आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. शनिवारी अधिवेशन संपणार
नवी मुंबई : नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याच्या विकास आराखड्याला आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. शनिवारी अधिवेशन संपणार असून तत्पूर्वी या विकास आराखड्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार सिडकोने नैना प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून नैना प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना आहे.
पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा विकास आराखडा तयार करून सूचना व हरकतीवरील सुनावणीसह सिडकोने तो अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. मागील चार महिन्यांपासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहे. त्यातच नैना क्षेत्रातील ८४ गावांचे २00 चौरस किलोमीटरचे क्षेत्र नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ७0 गावे प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट होणार असल्याने नैना प्रकल्पाच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.