नवी मुंबई : माथाडी नेते व राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी गणेश उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शविली. दोघांमध्ये जवळपास २० मिनिटे खासगीमध्ये चर्चा झाली. यामुळे पाटील हे भाजपामध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांची एक वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे. गतवर्षी २५ सप्टेंबरला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीलाही प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले होते. तेव्हापासून पाटील हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी सानपाडामध्ये एक खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी आमदार मंदा म्हात्रे, योगेश सागर, निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी बंद खोलीमध्ये जवळपास २० मिनिटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. माथाडी कामगारांच्या प्रश्नांबरोबर पक्षांतराविषयी चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी येणार असल्याच्या दिवशीच पाटील यांनी पूजेचे आयोजन केले असण्याची शक्यता आहे. रुग्णालय उद्घाटनाबरोबर पाटील यांच्या निवासस्थानी जाण्याचेही मुख्यमंत्र्यांच्या नियोजनामध्ये असल्याने त्यांच्या घराकडे जाणाºया मार्गावर सकाळपासून बंदोबस्त होता. मुख्यमंत्री व माथाडी नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.नाईकांची भेट झाली नाहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचण्याच्या अर्धा तासअगोदर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. ते तेथून निघून गेल्यानंतर मुख्यमंत्री व नरेंद्र पाटील घरी पोहोचले. नाईक व फडणवीस यांची भेट झाली नसली, तरी नरेंद्र पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्येही गणेश नाईकांच्या भाजपाप्रवेशाविषयी चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नरेंद्र पाटील, मुख्यमंत्री गुफ्तगू; बंद दरवाजाआड केली २० मिनिटे चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 2:05 AM