माथाडींचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य, मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागेही कामगारहित असल्याची नरेंद्र पाटील यांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 04:19 AM2017-09-26T04:19:33+5:302017-09-26T04:19:37+5:30
माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविणे हेच जीवनातील प्रमुख उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठीच घेतली.
नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविणे हेच जीवनातील प्रमुख उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठीच घेतली. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेमध्ये तथ्य नसल्याची भूमिका माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
माथाडी नेते नरेंद्र पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक वर्षापासून जवळीकता वाढली आहे. गणेशोत्सवामध्ये मुख्यमंत्री घरी येवून गेले होते. माथाडी मेळाव्यालाही त्यांना आमंत्रण दिले असल्यामुळे सर्वांचेच लक्ष मेळाव्याकडे लागले होते. नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबरच्या जवळीकतेविषयी स्पष्टीकरण दिले. माथाडींची सेवा सोडून दुसरे काहीही करायचे नाही. कामगारांचे प्रश्न कसे सोडवायचे याचाच विचार सतत करत असतो. यापूर्वी काँगे्रसच्या मुख्यमंत्र्यांनी कामगारांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले.
मेळाव्यालाही आमंत्रण देवून ते फिरकले नाहीत. आम्ही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यांनी वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असून जादा चटईक्षेत्र देण्याचेही मान्य केले आहे. आम्ही फक्त कामगारांचे प्रश्न सुटावे याचसाठी त्यांच्याकडे गेलो होतो. याव्यतिरिक्त कोणताही हेतू नाही. अनेकांनी याचे गैरअर्थ घेतले असल्याकडे शरद पवार यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री व शरद पवार यांना एका व्यासपीठावर आणून कामगारांचे प्रश्न सर्वांच्या निदर्शनास आणून देण्याचा विचार होता असेही त्यांनी स्पष्ट केले. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठीही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माथाडी मेळाव्यामध्ये सर्वच नेत्यांनी शरद पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तुटकरे यांनीही पवार साहेबांनीच नवी मुंबईमधील भूमिपुत्रांसाठी साडेबारा टक्के योजना मंजूर केली. कामगार, शेतकरी, प्रकल्पग्रस्त सर्वांचे प्रश्न सोडविण्यामध्येच आयुष्यभर काम केल्याचे मत व्यक्त केले. देशाच्या इतिहासामध्ये विधानसभा ते संसदेपर्यंत ५० वर्षे सतत कार्य करणारे एकमेव नेते असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिल्याचे मत व्यक्त केले.
माजी मंत्री गणेश नाईक यांनीही पवार साहेबांची क्षमता पंतप्रधान व राष्ट्रपती होण्याची आहे. त्यांनी कामगार, कष्टकºयांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे मत व्यक्त केले.
शशिकांत शिंदे यांनीही पवार साहेबांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असून कामगारांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानातून उतराई होण्यासाठी गौरव सोहळ्याचे आयोजन केल्याचे मत व्यक्त केले.
गर्दीचा विक्रम
माथाडी मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून कामगार येत असतात. यावर्षी मुख्यमंत्री व शरद पवार उपस्थित राहणार असल्याने कामगारांनी विक्रमी उपस्थिती दर्शविली होती. कांदा बटाटा मार्केटच्या लिलावगृहाबरोबर बाहेरही बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. दहा हजारपेक्षा जास्त कामगार मेळाव्याला उपस्थित होते. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक व राज्याच्या इतर भागातूनही कामगार मेळाव्याला आले होते.
मुख्यमंत्र्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून साधला संवाद
मेळाव्यास मुख्यमंत्री आले नसल्याने माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यासह सर्वांचीच निराशा झाली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीच्या माध्यमातून कामगारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासह घरांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. अनेक वर्षांपासून कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यास सरकार कटिबद्ध आहे. वडाळा येथील घरांसाठी जादा चटईक्षेत्र देण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यात येतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून तीन लाख तरूणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरूणांना उद्योग उभारण्यासाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. अण्णासाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा केला होता. आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यासाठीची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जनजागृतीसाठी सह्यांची मोहीम
माथाडी कामगारांशी संंबंधित असलेल्या तरूणांनी शिवस्वराज्य ढोल पथक स्थापन केले असून त्या माध्यमातून सामाजिक जागृतीही सुरू केली आहे. माथाडी मेळाव्यामध्ये शिस्तबद्धपणे संचलन करून या युवक, युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी बेटी बचाव, बेटी पढाव, वीर जवान तुझे सलाम, महाराष्ट्र पोलीस व इंडियन आर्मीला सपोर्ट करणारे संदेश देवून सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसही चांगला प्रतिसाद मिळाला.
माथाडी भूषण पुरस्कार मिळालेल्यांचा तपशील
नाव बोर्ड
झहीरउद्दीन दिलशेर ट्रान्सपोर्ट
रामचंद्र नरसू वाशिवले ग्रोसरी
सोपान तुकाराम जाधव भाजीपाला
तुकाराम ए. फडतरे रेल्वे
सुखदेव लक्ष्मण जरे लोखंड
हणमंत रंगनाथ कोळेकर क्लिअरिंग
उत्तम बजरंग पवार कापड
प्रवीण गोविंद पावसकर खोका
आनंदा धोंडीबा व्होगाडे सातारा
अशोक श्रीरंग गायकवाड पुणे
दत्तात्रय बबन मोरे पिंपरी चिंचवड
रमेश देवजी पालवे नाशिक
गणपत बबन आंधळे नाशिक
सुभाष शेळके अहमदनगर
बबरूवान तुकाराम जगताप लातूर
हिंदुराव दौलू रामाणे कोल्हापूर