शासनाचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, नरेंद्र पाटील यांची घणाघाती टिका

By नामदेव मोरे | Published: March 23, 2023 07:39 PM2023-03-23T19:39:58+5:302023-03-23T19:40:38+5:30

माथाडी चळवळीची अवस्था वाईट झाल्याची खंत...

Narendra Patil's criticism of the government's neglect of the issues of Mathadi workers | शासनाचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, नरेंद्र पाटील यांची घणाघाती टिका

शासनाचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, नरेंद्र पाटील यांची घणाघाती टिका

googlenewsNext

नवी मुंबई : राज्यातील माथाडी कामगार चळवळीची अवस्था वाईट झाली आहे. १५ वर्षात अनेक सरकारे बदलली पण कोणीच कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत. आतापर्यंतचे कामगार मंत्री स्वत: उद्योजक व कारखानदार असल्यामुळे त्यांना कामगारांचे हितच कळत नाही. आत्ताच्या मंत्र्यांना कामगारांचे प्रश्न समजत नसल्याची घणाघाती टिका माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. कामगारांचे प्रश्न सोडविले जात नसल्यामुळे संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीला कोणत्याच मंत्री व नेत्यांना न बोलावण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमीत्त माथाडी भवनमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. माथाडी कामगारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. बोर्ड उद्धस्त होत आहेत. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीमधील कामे एमआयडीसीत स्थलांतर होत आहेत. १५ वर्षापासून विविध सरकारकडे पाठपूरावा करून कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत. फक्त आश्वासनांवर बोळवण केली जात आहे. आत्ताच्या कामगार मंत्र्यांना कामगारांचे प्रश्नच समजत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. १५ वर्षातले कामगार मंत्री स्वत: उद्योजक किंवा कारखानदार असल्यामुळे त्यांना कामगारांचे हित समजत नसल्याची खंत व्यक्त केली. याला गणेश नाईक अपवाद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी कामगार चळवळ संकटात असून ती टिकविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. अण्णासाहेबांनी मराठा समाजासह कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान केले. मराठा आरक्षणासाठी स्वत:चे बलीदान दिले. आता कामगारांचे हित जपण्यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी गुलाबदार जगताप, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, पोपटराव देशमूख, ऋषीकांत शिंदे, रविकांत पाटील, ॲड. भारती पाटील, रमेश पाटील, शुभांगी पाटील, शशिकला पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्र्यांसह नेत्यांना आमंत्रण नाही -
अण्णासाहेब पाटील जयंती व पुण्यतिथीला प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सत्ताधारी व विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना आमंत्रण दिले जाते. मंत्रीही या मेळाव्याला उपस्थित रहात असतात. परंतु मागील १५ वर्षात कामगारांचे प्रश्न न सुटल्यामुळे यावर्षी कोणत्याच मंत्र्याला व नेत्याला मेळाव्योच आमंत्रण देण्यात आले नाही. मागील मागील चार दशकात पहिल्यांदा मंत्री व नेत्यांशिवाय मेळावा पार पडला. प्रश्न सुटत नसतील तर नेत्यांना बोलवायचे कशाला असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.

कामगारांपासून नेत्यांनी आत्मचिंतन करावे -
नरेंद्र पाटील यांनी सरकारवर टिका करतानाच संघटनेमधील त्रुटींवरही बोट ठेवले. कामगारांनी व संघटनेतील नेत्यांनीही आत्मचिंतन करावे. कामगार चळवळीसमोरील प्रश्नांना आपणही काही प्रमाणात जबाबदार आहोत. कामगारांच्या हितापेक्षा ठेकेदारीला प्राधान्य दिले जात आहे. एपीएमसीमधील माल एमआयडीसीत का जातो. माथाडींच्या हक्काची कामे त्यांना का भेटत नाहीत याविषयी चिंतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 

Web Title: Narendra Patil's criticism of the government's neglect of the issues of Mathadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.