नवी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरीसाठी नरेश म्हस्के यांनी घेतली मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट
By नारायण जाधव | Published: July 1, 2024 04:32 PM2024-07-01T16:32:06+5:302024-07-01T16:32:35+5:30
तातडीने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालयाची पाहणी करून महाविद्यालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली.
नवी मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांची मंजुरी मिळूनही केवळ तपासणी न झाल्याने नवी मुंबई महापालिकेच्या स्वमालकीच्या वैद्यकीय महाविद्यालयची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवारी दिल्ली येथे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन तातडीने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालयाची पाहणी करून महाविद्यालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली.
ठाणे लोकसभा मतदार संघातील नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पी.जी.आय.एम.एस.) या नावाने स्वमालकीचे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. केंद्र शासन, राज्य शासन यांचे विविध विभाग व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे. वैद्यकशास्त्र, बालरोग, स्त्रीरोग, शल्यचिकित्सक, अस्थिव्यंग या पाच विषयांसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे मंजुरीसाठी नवी मुंबई महापालिकेने अर्ज सादर केला असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली.
विहित शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे सादर केलेली आहेत. मात्र आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज सादर केल्यानंतर विहित नियमावलीप्रमाणे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केल्यानंतर पुढील मंजुरीची कार्यवाही होते. २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात तपासणी न झाल्याने या वर्षीची प्रवेश प्रक्रिया झालेली नसल्याने पालिकेचा अर्ज २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षात ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे आयोगाने पालिकेला कळविले असल्याची माहिती म्हस्के यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांना दिली.
संपूर्ण हिंदुस्थानातील पदव्युत्तर महाविद्यालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने नवी मुंबईच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 2025-26 या वर्षांसाठी प्रवेश परीक्षांबाबत कार्यवाही सुरू करणे आवश्यक आहे. या महाविद्यालयामुळे लक्षावधी गोरगरीब रुग्णांची मोठी सोय होणार आहे. तरी विभागाचे मंत्री महोदय म्हणून आपण संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन नवी मुंबई, रायगड, अलिबाग, पेण, खोपोली या मोठ्या कार्यक्षेत्रात सध्या एकही सर्वसामान्य रुग्णांसाठी रुग्णालय नसल्याने ते उपलब्ध होण्यासाठी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती म्हस्के केली आहे.