गणेश नाईकांच्या दरबारावर शिंदेसेनेचा 'खासदार भेटी'चा उतारा; वाशीतील उपक्रमास प्रतिसाद
By नामदेव मोरे | Updated: February 27, 2025 19:36 IST2025-02-27T19:36:11+5:302025-02-27T19:36:44+5:30
बोनकोडेतील ग्रामस्थांनीही मांडल्या समस्या

गणेश नाईकांच्या दरबारावर शिंदेसेनेचा 'खासदार भेटी'चा उतारा; वाशीतील उपक्रमास प्रतिसाद
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: वनमंत्री गणेश नाईक यांनी सुरू केलेल्या जनता दरबारानंतर शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत खासदार आपल्या भेटीला उपक्रम सुरू केला आहे. वाशीतील पहिल्याच उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. सिडको, महानगरपालिका, एमआयडीसीविषयी समस्या नागरिकांनी मांडल्या. गणेश नाईक यांच्या बोनकोडे गावातील नागरिकांनीही तेथील समस्या सोडविण्यासाठी निवेदन सादर केले.
वाशी येथील संपर्क कार्यालयामध्ये खासदार आपल्या भेटीला उपक्रम राबविण्यात आला. यावेळे शिंदे सेनेचे बेलापूर जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यात याव्यात. सिडकोतील घरांच्या हस्तांतरणाविषयीच्या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली. करावे परिसरातील नागरिकांनी जुन्या चाळींवर व घरांवरही कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. वनमंत्री गणेश नाईक यांच्या बोनकोडे गावातील नागरिकांनीही तेथील समस्या सोडविण्याची मागणी केली. गावातील मैदानाचा प्रश्न सोडविण्यात यावा. रस्ते व इतर समस्या सोडविण्यात याव्यात. बावखळेश्वर मंदिरासाठी जागा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नागरिकांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. वनमंत्र्यांच्या जनता दरबाराला पर्याय म्हणून हा उपक्रम सुरू केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना नियमीत भेटता यावे यासाठी खासदार आपल्या भेटीला उपक्रम राबविला जात असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक शिवराम पाटील, रमाकांत म्हात्रे, अनिकेत म्हात्रे, सरोज पाटील, शितल कचरे, राजू पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आम्ही दरबारी राजकारण करणारे नाही आहोत. रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य असते. यामुळे दरबार नाही तर खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे.
- नरेश म्हस्के, खासदार ठाणे
खासदार आपल्या भेटीला उपक्रमात बोनकोडे गावासह शहरातील सर्व विभागातील नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. यामध्ये सिडको, पोलीस, महानगरपालिका, एमआयडीसीशी संबंधीत प्रश्न होते.
- किशोर पाटकर, जिल्हा प्रमुख बेलापूर