पनवेल/अलिबाग : सध्याचे युग हे संशोधनाचे युग असून, अवकाश संशोधन हे सर्वांच्या परिचयाचे व आवडीचे संशोधन क्षेत्र आहे. अमेरिकास्थित ‘नासा’ ही अवकाश संशोधन संस्था जगभरातील नंबर एकची संस्था समजली जाते. याच संस्थेने हाती घेतलेल्या एका उपक्रमासाठी पनवेलमधील प्रणित पाटील या तरु णाची निवड करण्यात आली आहे. प्रणितच्या निवडीमुळे पनवेलचे नाव जगभरात प्रसिद्ध होईल, यात शंका नाही.
‘नासा’ व डॉ. जॉन सेपनियक यांच्या प्रकल्पांतर्गत अमेरिकेच्या यूहाट प्रांतात मंगळ डीरु ट रिसर्च स्टेशन या ठिकाणी संशोधन केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी मंगळ ग्रहाची कृत्रिम माती, मातीची निरनिराळी कार्बनयुक्त सयुंगे बनवणे, मंगळ ग्रहाचे कृत्रिम पर्यावरण तयार करून पृथ्वीवरील कृत्रिम बियांची पेरणी करण्यात येणार आहे. या वेळी दिसून येणारे परिणाम या संदर्भात हे संशोधन सुरू आहे.
भविष्यात मंगळ ग्रहावर वास्तव्य करण्याच्या दृष्टीने हे संशोधन सुरू आहे, याकरिता प्रणित पाटील याचे टीमसह २६ जानेवारी ते ९ फेब्रवारी दरम्यान यूहाट या संशोधन केंद्रावर वास्तव्य होते. संशोधन करताना राहणीमान, जेवण यामध्ये पूर्णपणे बदल करण्यात आल्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याला दिवस काढावे लागले. बेचव जेवण, टोमॅटोची पावडर, अंघोळीसाठी जेली आदीच्या आधारे या संशोधन केंद्रात दिवस काढल्याचे प्रणित सांगतो. भविष्यात चंद्रावर जाण्याचा योग आल्यास त्यासाठी आवश्यक व उपयुक्त माहिती या संशोधनातून हाती लागल्याचे प्रणित सांगतो.
प्रणित पाटील मूळचा अलिबागचा असला, तरी त्याचे शिक्षण पनवेलमध्ये झाले आहे. १९९१ मध्ये पनवेलमध्ये आल्यावर प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये झाले. २००९ मध्ये आयटी एमजीएम कॉलेज, कामोठे येथे पूर्ण केले. २०१० मध्ये घाटकोपर येथील प्रतिष्ठित कंपनीत असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून त्याने नऊ महिने काम केले. त्यानंतर २०१०-११ मध्ये अमेरिकन अलायन्झ या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून रु जू झाला. प्रणितचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.
अंतराळ संशोधनाची आवडप्रणितला संशोधनाची आवड असल्याने, त्याने ‘नासा’चे पॉवर पॉइंट अभ्यासले. अंतराळाबद्दल शास्त्रीय माहिती घेण्यासाठी आॅक्टोबर २०१४ मध्ये एज्युकेशन व्हिजा घेऊन अमेरिकेतील अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असलेल्या ‘एम्री रिडल एरोनॉटिकल’ युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळविला. २०१६ मध्ये १६०२ बॅचमध्ये सायंटिस्ट अॅस्टॉनॉट कँडिडेट या पदासाठी त्याची निवड झाली. जगविख्यात पायलट पॅटी वागस्टाफ यांच्याकडून एरोबॅटिक्सचे प्रशिक्षण घेतले. ‘साउदर्न ऐरोमेडिकल इन्स्टिट्यूूट’ मधून डॉ. पॉल बुझा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अॅडव्हान्स चेंबर प्रोग्राम’ पूर्ण केला आहे. तसेच ‘स्विस स्पेस सेंटर’ आणि ‘ईपीएफएल’मधून स्पेस मिशन डिझाइन आणि आॅपरेशन कोर्स पूर्ण केला आहे. सध्या ‘नासा’ स्पेस सेंटरचे ‘फिझिकल सायन्स इन्फॉरमॅटिक सिस्टीम’मध्ये ‘अॅनालिटिकल युजर’ म्हणूनही तो कार्यरत आहे.
भारतीय माणसाचे शरीर मंगळ ग्रहासाठी किती सक्षम आहे, याची चाचणी व्हावी. टीममध्ये सांस्कृतिक ठेवा वाढावा, याकरिता मंगळ ग्रहावरील अवकाश मानवी संशोधन करण्यात आले होते. हा अनुभव विस्मरणीय होता. प्रतिकूल परिस्थितीत चंद्रावर वास्तव्य करण्यासंदर्भात उपयुक्त माहिती या संशोधनात कळू शकली.- प्रणित पाटील,मंगळग्रह अवकाश मानवी संशोधक, नासा