पनवेल : सिडको वसाहतींमध्ये रहिवाशांना पनवेल तहसील कार्यालयाच्या वतीने अकृषिक कर भरण्यासंदर्भात नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. परंतु सिडकोने ही जागा सदनिकाधारकांना ६० वर्षांसाठी भाडेपट्टा करारावर दिल्या आहेत. त्यामुळे जमिनीचा मालक सिडको असल्याने अकृषिक करासंदर्भात कोणत्या आधारावर नोटीस धाडल्या, असा जाब विचारण्यासाठी विचारत शेकाप, राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. सिडकोने खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत आदी नोड विकसित केले आहे. अकृषिक कर हा जमीन विकसित करताना मालकाने भरणे आवश्यक असतो. सरकारने त्याच वेळेला सिडकोकडून कराची रक्कम वसूल करणे अपेक्षित होते. या वसाहतीत रहिवाशांनी सिडकोकडून सदनिका खरेदी करताना, सर्व प्रकारचे शुल्क भरलेले आहेत. मात्र गेल्या एक दीड महिन्यात सिडको वसाहतीत राहणाऱ्या जवळपास लाखभर सदनिकाधारकांना २८ ते ३२ वर्षांत प्रलंबित असलेल्या अकृषिक कर भरण्यासंदर्भात नोटिसा आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या गोष्टीचा निषेध करून तहसीलदारांना जाब विचारण्यासाठी धडक मोर्चा आयोजित केल्याचे पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले.संबंधित नोटिसा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला. यावेळी माजी नगरसेवक शिवदास कांबळे, शिवाजी थोरवे आदींसह मोठ्या संख्येने शेकाप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन देऊन हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. (प्रतिनिधी)
अकृषिक करावरून तहसीलवर धडक
By admin | Published: February 14, 2017 4:34 AM