पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या विज्ञान प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड
By योगेश पिंगळे | Published: February 14, 2024 04:01 PM2024-02-14T16:01:41+5:302024-02-14T16:04:24+5:30
आयुक्तांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.
योगेश पिंगळे,नवी मुंबई : नुकत्याच ३१ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत विज्ञान प्रकल्प स्पर्धेमध्ये ३६ जिल्हयांतील ४५ हजारहून अधिक विदयार्थी प्रकल्पाची नोंदणी झाली होती. त्यामधून ३० प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या गोठीवली येथील शाळा क्रमांक ४६ मधील प्रिती राठोड व पल्लवी सोळंके या दोन विदयार्थिनींनी साकारलेल्या अभिनव प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. त्याबद्दल या दोन्ही विदयार्थिनींचा महापालिका मुख्यालयातील विशेष समारंभात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गुणसंपन्न विदयार्थी घडविण्यासोबतच त्यांच्यातील अंगभूत गुणांना संधी उपलब्ध करुन देऊन त्यांच्या व्यक्तीमत्व विकासावरही भर दिला जात आहे. या अनुषंगाने विविध कला, क्रीडा प्रकारांप्रमाणेच विज्ञान प्रकल्प स्पर्धांमध्येही महापालिका शाळांतील विदयार्थी कामगिरी करत आहेत. या दोन विदयार्थिनींनी तयार केलेल्या प्रकल्पाची तालुका पातळीवरुन जिल्हा पातळीवर व पुढे जिल्हा पातळीवरुन राज्य पातळीवर आणि त्यापुढे राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. त्याचप्रमाणे गोठीवली शाळेतीलच अंश शर्मा व विलास गुरव या दोन विदयार्थ्यांनी सादर केलेल्या ‘बहुउपयोगी खुर्ची’ या प्रकल्पाची महापालिका स्तरावर महापालिका स्तरावर उत्त्म प्रकल्प म्हणून निवड झालेली आहे. त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
रायफल शुटींगमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या विद्यार्थिनींचाही सन्मान
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने विविध खेळांत नैपुण्य असणा-या महापालिका शाळेतील विदयार्थ्यांना उत्त्म दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध् करुन दिले जात आहे. यामधील रायफल शुटींग या ऑलिपिंक स्तरावरील मान्यताप्राप्त खेळाच्या प्रशिक्षण सुविधा केंद्रातून प्रशिक्षण घेऊन राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त करणा-या नुतन चौधरी व अंशिका प्रजापती या दोन महापालिका शाळेतील विदयार्थिनींना त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे व्यासपीठावर उपस्थित होते.