स्नेहा मोरे, मुंबईदुर्मिळ वा अतिदुर्मिळ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास यापुढे टॅक्सीडर्मीच्या स्वरूपात त्यांना कायमस्वरूपी जतन करण्यात येत आहे. गेली कित्येक वर्ष संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटरमध्ये टॅक्सीडर्मीस्ट आणि परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे शरीरशास्त्राचे प्राध्यापक डॉ. संतोष गायकवाड हे कार्य करत आहेत. मात्र एका गॅरजेच्या छोट्याशा जागेत सुरु करण्यात आलेले हे टॅक्सीडर्मी सेंटर लवकरच कात टाकणार असून त्याच जागी अद्ययावत आणि प्रशस्त टॅक्सीडर्मी सेंटर उभे राहणार आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १ आॅक्टोबर २००९ मध्ये टॅक्सीडर्मी सेंटर सुरु झाले. तेव्हापासून अनेक प्राणी, पक्षी, मासे यांच्या प्रतिकृती येथे तयार करण्यात आल्या आहेत. नव्या आणि अद्ययावत टॅक्सीडर्मी सेंटरचा आराखडा तयार असून मे महिन्याच्या अखेरीस आताच्या सेंटरच्या जागी त्याची पुर्नबांधणी करण्यात येईल. सध्या हे सेंटर ८०० चौरस फूटांच्या जागेत आहे, मात्र पुर्नबांधणी प्रक्रियेत या जागेचा विस्तार करुन १२०० चौरस फूटांमध्ये विस्तारण्यात येईल. या नव्या सेंटरमध्ये स्टॉरेज आणि एक्झिबिट रुम, माउंटीग रुम, फ्लेशिंग रुम, कलेक्शन सेंटर, स्केलटन रुम, क्ले मॉडेलिंग रुम असे वेगवेगळे विभाग असतील. शिवाय, अखेरीस सूर्यप्रकाश आणि हवा यापासून टॅक्सीडर्मींचे जतन करणारी विशेष रुम असणार आहे, या रुमला काचेचे आवरण असेल. मुंबईतील आर्किटेक्ट राजीव पळशीकर यांनी या नव्या आराखड्याची संकल्पना मांडली आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे तत्कालीन मुख्य वन संरक्षक सुरेश थोरात (मुंबई विभाग) आणि प्रधान मुख्य वन संरक्षक बिमल मुजूमदार(नागपूर विभाग) यांच्या सहकार्याने टॅक्सीडर्मी सेंटर प्रत्यक्षात आले. २००४-०५ च्या दरम्यान बिमल मुजूमदार यांनी पट्टेरी वाघाची टॅक्सीडर्मी करण्यासाठी म्हैसूरला पाठविली होती, मात्र काही कारणास्तव ही टॅक्सीडर्मी होऊ शकली नाही. त्यावेळी तो मृत वाघ परत मागवून त्याची टॅक्सीडर्मी करण्यात आल्याचे डॉ.गायकवाड यांनी सांगितले.
नॅशनल पार्कमधील टॅक्सीडर्मी सेंटर कात टाकणार!
By admin | Published: May 13, 2015 12:41 AM