नवी मुंबई विभागामार्फत राष्ट्रीय डाक सप्ताह; बचत योजनांची दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:58 PM2020-10-16T23:58:25+5:302020-10-16T23:58:57+5:30

राष्ट्रीय डाक सप्ताहाचे निमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा, तसेच जगजागृतीचे आयोजन

National Postal Week through Navi Mumbai Division; Information given on savings schemes | नवी मुंबई विभागामार्फत राष्ट्रीय डाक सप्ताह; बचत योजनांची दिली माहिती

नवी मुंबई विभागामार्फत राष्ट्रीय डाक सप्ताह; बचत योजनांची दिली माहिती

googlenewsNext

पनवेल : आजच्या जागतिकीकरणाच्या काळात भारतीय डाक विभागाने कात टाकली असून, आधुनिकतेचा स्विकार केला आहे.  दीडशे वर्षांहून अधिकचा इतिहास असलेल्या भारतीय डाक विभागामार्फत दिनांक ९ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘राष्ट्रीय डाक सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई डाक विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. 

०९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने सर्व टपाल कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन ‘ताणतणाव व्यवस्थापन शिबिर’ आयोजित करण्यात आले, तसेच नागरिकांच्या प्रतिनीधींची ‘पोस्ट फोरम सभा’ विविध टपाल कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली. १० ऑक्टोबरला डाक बँकिंग दिवसाच्या निमित्ताने डाक विभागाच्या विविध बचत योजनांसंदर्भात नागरिकांमधे जनजागृती करण्यात आली. सातशेपेक्षा जास्त बचत खाती या दिवशी उघडण्यात आली. १२ ऑक्टोबर रोजी टपाल जीवन विमा दिनानिमित्ताने पनवेल हेड पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी माहितीपर काउंटर सेवा उपलब्ध करून देण्यात आली, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ऑनलाइन माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले. डाक जीवन विमा पॉलिसींच्या मॅच्युरिटी, तसेच मृत्यू दाव्यांचे निवारण व धनादेश वाटप या दिवशी करण्यात आले. १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय फिलँटेली (Stamp Collection) दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषा पनवेल विभागीय कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आली. १४ ऑक्टोबर रोजी व्यवसायवृद्धी दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने नवी मुंबई डाक विभागाच्या कार्पोरेट ग्राहकांची ऑनलाइन सभा आयोजित करण्यात आली. १५ ऑक्टोबर रोजी डाक (मेल्स) दिवसाच्या निमित्ताने नागरिकांसाठी ‘नो युअर पोस्टमन’ (Know Your Postman) हा उपक्रम राबविण्यात आला, तसेच त्वरित टपाल वितरणासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.  हे उपक्रम राबविताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले. संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीत नवी मुंबई डाक विभागाने जनतेला टपाल सेवा उपलब्ध करून दिली. 

भारतीय डाक विभागाने आधुनिकतेची कास धरली असून, सोबतच दीडशे वर्षांपासूनची विश्वसनीयता जपलेली आहे. नवी मुंबई डाक विभाग ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, डाक विभागाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन घ्यावा.  – डॉ. अभिजीत इचके, वरीष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, पनवेल

Web Title: National Postal Week through Navi Mumbai Division; Information given on savings schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.