नवी मुंबईतून राष्ट्रवादीला मताधिक्याची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:29 PM2019-05-22T23:29:41+5:302019-05-22T23:29:50+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघ : गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला

Nationalist hope for NCP from Navi Mumbai | नवी मुंबईतून राष्ट्रवादीला मताधिक्याची आस

नवी मुंबईतून राष्ट्रवादीला मताधिक्याची आस

Next

नवी मुंबई : ठाणे लोकसभा क्षेत्रात सहापैकी विधानसभेचे ऐरोली आणि बेलापूर हे दोन मतदारसंघ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोडतात. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबोला असला, तरी मोदी लाटेत बेलापूरचा किल्ला राष्ट्रवादीला गमवावा लागला होता, तर ऐरोली विधानसभा क्षेत्रात अगदी निसटता विजय मिळविण्यास राष्ट्रवादीला यश आले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातून या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अनंत परांजपे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना निवडून आणण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी उचलला होता. लोकसभेच्या मागील निवडणुकीत नवी मुंबईतून शिवसेनेचे राजन विचारे यांना आघाडी मिळाली होती. मात्र, या वेळी ही आघाडी मोडीत काढून परांजपे यांना मताधिक्य मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे.


लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत विचारे यांना बेलापूर मतदारसंघातून तब्बल ३५ हजार, तर ऐरोली मतदारसंघातून जवळपास २० हजार मताधिक्य मिळाले होते. एकूणच त्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून सुमारे ५५ हजार मतांची लीड घेतली होती. या वेळी विचारे यांना नवी मुंबईतून मागच्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिवसेनाला वाटत आहे. तर नवी मुंबईतून परांजपे यांना किमान ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, अशी खात्री राष्ट्रवादीला वाटते आहे.


मागील पाच वर्षांत दिघ्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला. राष्ट्रवादीचे नवीन गवते यांच्या कुटुंबात तीन नगरसेवक आहेत, त्यामुळे या परिसरात गवते कुटुंबीयांचा प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकीत या विभागातील मते कोणाच्या पारड्यात पडली, हे उद्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढलेले संदीप नाईक यांच्या विरोधात लढलेले त्यांचे चुलत बंधू वैभव नाईक यांना ४६ हजार मते मिळाली होती, या वेळी नाईक कुटुंबीयांतील राजकीय दरी दूर झाल्याचे दिसून आले. त्याचा राष्ट्रवादीचे अनंत परांजपे यांना किती फायदा होतो, हे स्पष्ट होणार आहे.
माजी मंत्री गणेश नाईक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे परांजपे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रचाराचा धुराळा उडविला. त्यांच्या सोबतीला माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक मैदानात उतरल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी काँग्रेसशी जुळवून घेण्यातही नाईक यांना यश आल्याचे दिसून आले. त्यामुळे याचा किती प्रभाव मतदारांवर पडतो, हेही गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

युतीमध्ये मनोमिलनाचा अभाव
बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहे. विधानसभेच्या मागील निवडणुकीत सेनेचे विजय नाहटा यांना ५०,९८३ मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांच्यापेक्षा अवघ्या दीड हजार मताधिक्यांनी विजयी झालेल्या मंदा म्हात्रे यांना ५५,३१६ इतकी मते मिळाली होती.
नाहटा आणि मंदा म्हात्रे यांना मागच्या निवडणुकीत मिळालेली एकगठ्ठा मते विचारे यांच्या पारड्यात पडतील, अशी अटकळ शिवसेनेचे नेते बांधत आहेत; परंतु प्रत्यक्ष प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यात फारसे मनोमिलन झाल्याचे दिसले नाही, त्यामुळे बेलापूरमधून राजन विचारे मतांची आघाडी राखण्यात कितपत यशस्वी होतील, हे मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

Web Title: Nationalist hope for NCP from Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :maval-pcमावळ