मनपाच्या सत्ताकेंद्रातून राष्ट्रवादी बाद
By admin | Published: May 10, 2016 02:11 AM2016-05-10T02:11:01+5:302016-05-10T02:11:01+5:30
शिवसेना, भाजपाने काँग्रेसच्या मदतीने माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. स्थायी समिती सभापतीपद आपल्याकडे खेचून विरोधकांनी
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
शिवसेना, भाजपाने काँग्रेसच्या मदतीने माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. स्थायी समिती सभापतीपद आपल्याकडे खेचून विरोधकांनी नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला महापालिकेच्या सत्ताकेंद्रातून जवळ जवळ बाद केले आहे. कारण संख्याबळाने सर्वात मोठा पक्ष असून, राष्ट्रवादीकडे आता महापालिकेचे एकही महत्त्वाचे पद राहिलेले नाही.
नवी मुंबईचे सर्वेसर्वा म्हणून गणेश नाईक यांची ओळख आहे. सलग २५ वर्षे महापालिकेत त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता मिळवून त्यांनी हे सिद्धही केले आहे. असे असले तरी मागील दोन वर्षांपासून नाईक यांचा हा डोलारा ढासळू लागला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर लगेच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फारसी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे जेमतेम काठावर पास झालेल्या राष्ट्रवादीला अपक्ष आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन करावी लागली. विशेष म्हणजे ही तडजोड करीत असताना अपक्षाला चक्क महापौर आणि काँग्रेसला उपमहापौर पद द्यावे लागले. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादीला पहिल्या वर्षी केवळ स्थायी समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले. परंतु नेत्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळे आता हे पदसुध्दा राष्ट्रवादीला गमवावे लागले आहे. एकूणच सर्व असून ही काहीच नाही, अशीच काहीशी अवस्था आता राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. या सर्व परिस्थितीला नाईक यांची पारंपरिक कार्यपध्दती जबाबदार असून, यात त्यांच्या दोन सुपुत्रांचे बऱ्यापैकी योगदान असल्याचे दिसून आले आहे.
गणेश नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे छोटे चिरंजीव संदीप नाईक हे ऐरोली मतदारसंघातून काठावर पास झाले. मात्र बेलापूर विधानसभा क्षेत्रातून नाईक यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. याचा परिणाम म्हणून पुढील काही महिने त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी बंद केल्या. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली. परंतु या आक्रमकपणामुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला जेमतेम सत्तेच्या काठापर्यंतच पोचता आले. एकूणच मागील दोन वर्षांत राजकीय रणनीती आखण्यात नाईक सातत्याने अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानतंर खऱ्या अर्थाने नाईक यांच्या साम्राज्याला हादरे बसायला सुरुवात झाली. नेत्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते हवालदिल झाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठे भगदाड पडले. पक्षातील आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी स्वहिताचा विचार करीत सोयीच्या पक्षांची कास धरली. पक्षाला लागलेल्या या गळतीकडे नाईक पिता-पुत्रांनी सपशेल पाठ फिरविली. फाजील आत्मविश्वास व निष्ठावंताना गृहीत धरून विरोधकांना गोंजारण्याची नाईक पिता-पुत्रांची कार्यप्रणाली त्यांच्याच अंगलट आली. याचा जबर फटका महापालिका निवडणुकीत बसला.
विशेष म्हणजे याचे दुरगामी परिणाम ज्ञात असतानाही नाईक बेसावध राहिले. त्यामुळे महापालिका तिजोरीच्या चाव्याही गमवाव्या लागल्या.