कसारा : नोटबंदीमुळे आधीच हतबल झालेल्या नागरिकांना आता प्रशासनाने अजून एक धक्का दिला आहे. ५०० आणि हजारच्या जुन्या नोटा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत न स्वीकारण्याचा अध्यादेश रिझर्व्ह बँकेने काढल्याने सर्वांची पंचाईत झाली आहे. ६० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कसारा आणि परिसरातील गावपाड्यांतील ग्रामस्थांना जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि नव्या चलनी नोटा मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कसाऱ्यात एकच राष्ट्रीयीकृत बँक असल्याने सकाळी ६ वा.पासून बँकेबाहेर रांग दिसते आहे.ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५ टक्के गावांत राष्ट्रीयीकृत बँका कमी प्रमाणातच आहेत. काही गावांत तर तीसुद्धा नाही. रिझर्व्ह बँकेच्या फतव्यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५०० आणि १००० रु.च्या नोटा घेणे बंद केल्याने कसारा खु. वेळुक, वाशाळा, ठाकणे, कसारा बु. यासह अन्य १६ गावपाड्यांतील हजारो खातेदार पैसे बदलून घेण्यासाठी वणवण फिरत आहेत. येथील राष्ट्रीयीकृत बँकेत ५० टक्के ग्रामस्थांचे खातेच नसल्याने नव्याने खाते उघडण्यासाठी जाणाऱ्यांनादेखील अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)
राष्ट्रीयीकृत बँका नाहीत; जिल्हा बँकेचा उपयोग नाही
By admin | Published: November 18, 2016 2:54 AM