नैसर्गिक नाल्यांचा झोपडीवासीयांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:54 AM2018-05-13T05:54:23+5:302018-05-13T05:54:23+5:30
जेएनएनयूआरएम अंतर्गत निधी मिळाला नसल्याने महापालिकेचे एकत्रित नाला व्हिजन बारगळले आहे.
नवी मुंबई : जेएनएनयूआरएम अंतर्गत निधी मिळाला नसल्याने महापालिकेचे एकत्रित नाला व्हिजन बारगळले आहे. नाल्यांना संरक्षण भिंत नसल्यामुळे नेरुळ ते दिघा दरम्यान अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक बाजूला डोंगररांगा व दुसऱ्या बाजूला खाडी आहे. पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी १० प्रमुख व २९ मोठ्या नाल्यांमधून खाडीला जाऊन मिळते. अनेक नाल्यांमधून नदीप्रमाणे पाणी ओसंडून वाहत असते. २६ जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये नाल्यांमधील पाणी वसाहतीमध्ये जाऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता. यानंतरही इंदिरानगर परिसरामध्ये नाल्यामध्ये वाहून गेल्याने नागरिकांचा जीव गेला होता. नैसर्गिक नाल्यांचे संरक्षण करण्यासाठी ठोस योजनाच नसल्यामुळे नाल्यांच्या काठावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. एमआयडीसीमध्ये काही ठिकाणी कारखान्यांना भूखंड देण्यासाठी प्रवाह बदलण्यात आले आहेत. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्याने पात्र अरुंद झाले आहे. अतिक्रमणामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी रोडवर व वसाहतीमध्ये जाऊ लागले आहे. माजी महापौर सुधाकर सोनावणे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी वेळोवेळी हा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण व इतर सभांमध्ये उपस्थित केला होता. महापालिकेने दहा वर्षांपूर्वीच एकत्रित नाला व्हिजनची योजना तयार करून जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. नगरसेवकांनी नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केल्यानंतर नाला व्हिजनअंतर्गत कामे केली जाणार असल्याचे सांगितले जात होते; परंतु जेएनएनयूआरएमने नाला व्हिजनची योजना नाकारल्यामुळे पालिकेला स्वत:च्या निधीमधून हे काम करावे लागणार आहे.
एमआयडीसीमध्ये बोणसरी, इंदिरानगर, दिघा, चिंचपाडा, सुभाषनगर, इलठाणपाडा व इतर अनेक ठिकाणी नाल्यांच्या बाजूला वसाहती आहेत. यापैकी फक्त इंदिरानगरमध्ये तेथील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून नाल्याला संरक्षण भिंत बांधून घेतली आहे. इतर ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाळ्यात पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे. एमआयडीसीमध्ये दोन ठिकाणी नाल्यावर कंपनी उभी राहिली आहे. नैसर्गिक नाला बुजवून त्यावर बांधकाम केल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व नैसर्गिक नाल्यांचे संरक्षण व देखभालीसाठी धोरण नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. लवकर याविषयी ठोस निर्णय न घेतल्यास त्याचा फटका रहिवाशांना बसणार आहे.
चिंचपाड्याचा प्रस्ताव तयार
महापालिका प्रभाग-८ मधील मनपा शाळा क्रमांक ५३ ते रिलायबल कंपनीपर्यंत नाल्यातील पाणी प्रत्येक वर्षी वसाहतीमध्ये जात आहे. जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले व नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी नाल्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, यासाठी मागणी केली आहे. प्रशासनाने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप हा ठराव सभेपुढे आलेला नाही. यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांमध्ये असंतोष असून, अशीच स्थिती राहिल्यास आंदोलनाचा इशारा नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी दिला आहे. पालिकेला साकडे
नेरुळ एमआयडीसीमधील बोणसरी झोपडपट्टीमध्येही प्रत्येक वर्षी पावसाचे पाणी शिरत आहे. शिवसेनेच्या वतीने वारंवार महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. शाखाप्रमुख महेश कोठीवाले, मोहम्मद शेख, महेबूब पटेल, सागर मनगूतकर, शांताराम गावई, मुबारक चुगींवाले, कल्मेश मनगूतकर, मिलन दास, राजू मोडके, जलील चुगींवाले, हितेश जाधव यांनी यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे.प्रवाह बदलला
एमआयडीसीमध्ये दोन कंपन्यांनाना नैसर्गिक नाल्याच्या दोन्ही बाजूचा भूखंड दिला आहे. कंपनीने नैसर्गिक नाला बुजविला आहे. नाल्यावर बांधकाम केले असून, आकार कमी केला आहे. याविषयी एमआयडीसीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतलेली नाही.