रस्त्यांना डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप
By Admin | Published: April 18, 2017 06:53 AM2017-04-18T06:53:10+5:302017-04-18T06:53:10+5:30
सिडको नोडमधील सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी बुधवार, १२ एप्रिलपासून कामबंद आंदोलन छेडले आहे. सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे सिडको
पनवेल : सिडको नोडमधील सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी बुधवार, १२ एप्रिलपासून कामबंद आंदोलन छेडले आहे. सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे सिडको वसाहतीतील बहुतांश रस्त्यांना अक्षरश: डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. कचराकुंड्या तुडुंब भरल्याने रस्त्यावर कचरा पसरला आहे. हा कचरा कुजल्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
सहावा दिवस उजाडला तरी खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, वडघर, तळोजा या सिडको नोडमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर पडला आहे. अनेक दिवसांचा हा कचरा कुजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर सफाई कामगार ठाम आहे. तर दुसरीकडे सिडको प्रशासन सफाई कामगारांशी बोलण्यास तयार नसून हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. सिडकोने नेमलेल्या ३५ कंत्राटदारांची कचरा उचलण्याची जबाबदारी असून सफाई कामगारांच्या मागण्यांच्या पूर्ततेची जबाबदारीही कंत्राटदारांचीच असल्याचे सिडको प्रशासनाचे म्हणणे आहे.
सिडको महामंडळाकडून १३०० कंत्राटी कामगारांची सातत्याने आश्वासनावर बोळवण केली. त्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागल्या नाहीत. ग्रामपंचायतीतून वर्ग झालेल्या तीनशेपेक्षा जास्त कामगारांना महापालिकेने सात महिने वेतन दिले नसल्याने कामगार एकवटले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची स्टंटबाजी
विविध मागण्यांकरिता सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करणे विरोधी पक्षासाठी स्वाभाविक आहे. मात्र पनवेलमध्ये केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षच सिडको आणि महापालिकेविरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने मंगळवारी कचराफेक आंदोलन पुकारले होते. परंतु त्याआधीच सोमवारी सिडको भवनवर मोर्चा काढून आपल्याच भूमिकेला छेद दिल्याची चर्चा आहे.
पनवेल परिसरात पाच दिवस कचरा उचलला न गेल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांची भेट घेवून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली.
सफाई कामगार आणि सिडको यांच्यातील वादाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे या प्रश्नाची प्राधान्याने सोडवणूक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. पर्यायी व्यवस्था करून संध्याकाळी पाच वाजल्यापासून कचरा उचलला जाईल, असे आश्वासन राजेंद्र चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानुसार पनवेल परिसरातील सिडकोच्या काही नोड्समध्ये कचरा उचलण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.
परंतु सफाई कर्मचाऱ्यांनी त्यास तीव्र विरोध केला. सायंकाळी ७ वाजता नवीन पनवेल सेक्टर १ येथे कचरा उचलायला गेलेल्या कंत्राटदाराला कामगारांनी हुसकावून लावले. विशेष म्हणजे सफाई कामगार आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने येत्या काळात कचऱ्यावरून पेटलेले हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.