नवी मुंबईत बेलापूरमधील धबधब्यासह निसर्गही उपेक्षित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:33 PM2020-09-20T23:33:46+5:302020-09-20T23:34:05+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : देखभालीअभावी पर्यटन स्थळ बनले मद्यपींचे अड्डे: पर्यटकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह
नामदेव मोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्मार्ट सिटीमधील उपेक्षित पर्यटन स्थळांमध्ये बेलापूरमधील धबधबा व डोंगररांगेचाही समावेश आहे. सिडको, महानगरपालिका वनविभाग व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पर्यटन स्थळ मद्यपींचा अड्डा बनले आहे. गांजा व इतर अमली पदार्थ ओढणाऱ्यांचाही या परिसरात वावर वाढला असून, सर्वसामान्य पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. एक बाजूला दिवा ते दिवाळेपर्यंत समृद्ध खाडीकिनारा व दुसºया बाजूला दिघा, अडवली भुतावली ते बेलापूरपर्यंतची डोंगररांग पसरली आहे, परंतु या नैसर्गिक संपत्तीचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्याकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. बेलापूरमधील धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करत असतो, परंतु या परिसरामध्ये सुरक्षेसाठी काहीही व्यवस्था नसल्यामुळे धबधब्याच्या मार्गात व जंगलात मद्यपींचे अड्डे तयार झाले आहेत. गांजा ओढणाऱ्यांची टोळकीही अनेक ठिकाणी बसल्याचे चित्र पाहावयास मिळते. पोलीस, वनविभाग, सिडको व महानगरपालिका सर्वांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. मद्यपींवर कधीच कारवाई केली जात नाही.
बेलापूर डोंगरातील धबधबाच नाही, तर संपूर्ण परिसराचे निसर्ग पर्यटन स्थळामध्ये रूपांतर करता येऊ शकते. या परिसरात जवळपास ८ प्रकारचे बेडूक, ११ प्रकारचे सरडे, २४ प्रकारचे साप व विपुल प्रमाणात वनसंपदा या परिसरात आढळून येते. पक्षी, प्राणी यांची संख्याही लक्षणीय आहे. यामुळे निसर्ग अभ्यासक वर्षभर या परिसराला भेटी देत असतात, परंतु जंगलात वनविभाग किंवा इतर कोणत्याच शासकीय अस्थापनेने सुरक्षेची व्यवस्था केलेली नाही. यामुळे अभ्यासकांनाही हा परिसर असुरक्षित वाटत आहे. पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते योगेश चव्हाण यांनी येथील जैवविविधतेचा अभ्यास केला आहे. या परिसरातील मद्यपी व गांजा ओढणाºयांचे अड्डे बंद करण्यासाठी प्रयत्न केला. पोलीस स्टेशनपासून सर्वच शासकीय आस्थापनांकडे पत्रव्यवहार केला आहे, परंतु सर्वांनीच जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय अनास्थेमुळेच हा परिसर उपेक्षित राहिला असल्याची खंत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.
पर्यावरणप्रेमींची धडपड : बेलापूरमधील पर्यटन स्थळ परिसरातील मद्यपींचे अड्डे बंद व्हावे. धबधबा परिसरात जाण्यासाठी पायवाट असावी, सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.
अतिक्रमण वाढण्याची शक्यता : बेलापूर डोंगरामध्ये अनधिकृत बांधकामे वाढू लागली आहेत. झोपड्यांची संख्याही वाढली आहे. धबधबा परिसर व पूर्ण जंगलाच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना नाहीत .
डोंगररांगेची वैशिष्ट्ये
च्येथील घनदाट जंगलामध्ये नाग, अजगरपासून २४ प्रकारचे साप आढळतात.
च्ब्लू मॉरमॉनसह विविध प्रकारची फुलपाखरे आढळतात.
च्वड, पिंपळ, मोह, करवंद, अळू, आंबे, कुंभा, धायटी, अर्जुन, पळस, पांगारा, कुडा, माड,रानकेळी, साग, फणस व इतर विपूर प्रमाणात वृक्षसंपदा येथील जंगलात आहे.
च्साळिंदर, रानडुक्कर, ससे, वानर, घोरपड, रानमांजर व इतर अनेक प्राणी जंगलात आढळतात.
बेलापूर डोंगररांगेमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आढळतात. विपुल प्रमाणात वनसंपदा आहे. पावसाळ्यात येथील धबधब्याचे आकर्षण पर्यटकांना असते, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा परिसर उपेक्षित राहिला आहे. धबधबा परिसर मद्यपींचा अड्डा झाला असून, हे प्रकार थांबविण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
- योगेश चव्हाण, निसर्ग अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते