नवी मुंबई : कोपरखैरणे निसर्ग उद्यानामध्ये काम करणा-या अनिल मारुती पाटील (४२), या कंत्राटी कामगाराचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. अतिक्रमण विभागाने येथे ठेवलेले भंगार साहित्य व खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यांमुळे डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. लोकप्रतिनिधींनी साफसफाईची मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने तुर्भे डम्पिंग ग्राउंड बंद करून तेथे निसर्ग उद्यान विकसित केले आहे. निसर्ग उद्यानाची देखभाल करण्यासाठी १३ कर्मचारी नियुक्त केले आहेत. निसर्ग उद्यानाला लागूनच महापालिकेने भंगाराचे गोडाऊन तयार केले आहे. शहरामध्ये अतिक्रमण विभागाने कारवाई केलेले सर्व साहित्य याच ठिकाणी ठेवण्यात येत आहे. फेरीवाल्यांच्या जप्त केलेल्या वस्तू, भंगार वाहनेही या ठिकाणी ठेवण्यात येत आहेत. या भंगार साहित्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. याशिवाय या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्येही पाणी साचून राहात आहे. या सर्वांमुळे परिसरामध्ये डासांचा उपद्रव वाढला आहे. निसर्ग उद्यानामध्ये काम करणाºया अनिल मारुती पाटील या कर्मचाºयालाही आॅगस्ट अखेरीस ताप येऊ लागला. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले; परंतु डेंग्यूमुळे पेशींची संख्या कमी झाली व अखेर ३ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला आहे. उद्यान विभागातील कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यामुळे इतर कर्मचाºयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाने योग्य काळजी घेतली नाही, तर अजून कर्मचाºयांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे.निसर्ग उद्यानामधील कर्मचाºयांच्या समस्या, भंगार साहित्यामुळे निर्माण होणारी डासांची उत्पत्ती याविषयी प्रभाग ५२च्या नगरसेविका निर्मला आनंदराव कचरे यांनी महापालिकेच्या अधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. निसर्ग उद्यानाच्या बाजूचा भूखंड मोकळा करण्यात यावा. तेथील सर्व भंगार साहित्य हटविण्यात यावे व त्या जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे; परंतु प्रशासनाने या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. भंगार साहित्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. एका कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या परिसराची योग्य साफसफाई केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही कचरे यांनी दिला आहे.निसर्ग उद्यानाच्या बाजूला भंगार वाहने, अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य टाकले जात आहे. यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागली आहे. एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला असून, आता तरी प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी.- निर्मला कचरे,नगरसेविका, प्रभाग ५२
निसर्ग उद्यानातील कर्मचा-याचा डेंग्यूने मृत्यू, प्रशासनाचे दुर्लक्ष, भंगार साहित्यामुळे कर्मचा-यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 6:59 AM