राष्ट्रीय एकतेसाठी धावले नवी मुंबईकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:50 PM2018-10-31T23:50:37+5:302018-10-31T23:51:14+5:30

पोलिसांतर्फे मॅरेथॉनचे आयोजन; लहान मुलांसह तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग

Nava Mumbaikar ran for national unity | राष्ट्रीय एकतेसाठी धावले नवी मुंबईकर

राष्ट्रीय एकतेसाठी धावले नवी मुंबईकर

Next

नवी मुंबई : राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ या शीर्षकाखाली मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दोन व पाच किलो मीटरच्या अंतरासाठी झालेल्या या मॅरेथॉनमध्ये लहान मुलांसह तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या वेळी प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यानुसार बुधवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाहतूक शाखेमार्फत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील अरेंजा चौकातून या मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. पाच व दहा कि.मी.च्या अंतराच्या दोन गटांत झालेल्या मॅरेथॉनमध्ये ७०० हून अधिक स्पर्धकांनी, तसेच पोलिसांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. नागरिकांना एकतेचा संदेश देण्याच्या भावनेतून त्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला, उपआयुक्त तुषार दोशी, सुरेश लोखंडे, सुधाकर पठारे, अशोक दुधे, पंकज डहाळे आदीसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी हल्ली व्यायामाच्या प्रकारात तरुणांचे आकर्षण असलेल्या झुंबाचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाच कि.मी. अंतराच्या पुरुष गटातून करण देवरे, स्वप्निल लवटे व राणाप्रताप सिंग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे महिलांच्या गटातून कोमल खांडेकर, संगीता पाटील व पूजा कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. तर दहा कि.मी. अंतराच्या पुरुष गटातून विद्यानंद यादव, मनोज गावित, तुषार पवार यांनी तर महिला गटातून स्नेहा ठक्कर, प्रतिची दिघेकर व वंदना आझाद यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून ६८ वर्षीय आर. के. शर्मा यांनी प्रथम, तर स्वाती भागवत व शोभा मेनन यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. लहान मुलांच्या गटातून जमनेश पाटील, वैभवी भोइटे व शुभम मलिक यांनी अनुक्रमे बाजी मारली. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याची सामूहिक शपथही घेतली.

भाजपातर्फे एकता रॅली
राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्यावर भाजपातर्फे कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रॅली काढण्यात आली. या वेळी घोषणांच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला, तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. रॅलीमध्ये आमदार रमेश पाटील, नगरसेविका उषा पाटील, कृष्णा पाटील यांच्यासह भाजपा ऐरोली विधानसभा क्षेत्रातले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाशीत पोलिसांचे संचलन
राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्यावर पोलिसांच्या वतीने वाशी रेल्वेस्थानक ते वाशी पोलीस ठाण्यादरम्यान संचलन करण्यात आले. त्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हाती राष्ट्रध्वज घेऊन निघालेले हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: Nava Mumbaikar ran for national unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.