मोरबे धरणग्रस्त गावांतील कामे नवी मुंबई महापालिका करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:52 AM2019-01-20T00:52:11+5:302019-01-20T00:52:15+5:30
मोरबे धरण प्रकल्पाअंतर्गत सात गावे आणि आठ वाड्या विस्थापित झाल्या आहेत.
नवी मुंबई : मोरबे धरण प्रकल्पाअंतर्गत सात गावे आणि आठ वाड्या विस्थापित झाल्या आहेत. या पुनर्वसित गावांसाठी पाणीपुरवठा करण्याचे काम नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामध्ये जलवाहिन्या टाकणे, भूस्तरीय टाक्या बांधणे, रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदी कामे सुमारे पाच कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवार, १९ जानेवारी रोजी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी मांडला होता, त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे.
मोरबे धरण प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेल्या गावांमधील नागरिकांना नळ योजना, खेळाचे मैदान असलेली शाळा, चावडी व समाजमंदिर, अंतर्गत रस्ते, विजेची सोय, दहनभूमी, दफनभूमी, उघडी गटारे, सार्वजनिक शौचालय, गायरान जमीन, गुरचरण, परिवहन थांब्यासाठी जागा, खेळवाडी, भविष्यातील वाढीव जमीन देऊन विस्थापित करण्यात आले आहे.
गावांना २००३ सालापासून नागरी सुविधा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरविण्यात येत असून, पाणीपुरवठा करण्यास नकार दिला असून सदरच्या योजना भविष्यात नवी मुंबई महापालिकेने चालवाव्यात, यासाठी नागरिकांनी मोरबे धरणावर मोर्चे काढून वेळ प्रसंगी पाणी बंद करून आंदोलने केली आहेत. या ठिकाणी टंचाईग्रस्त गावांना महापालिकेच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
>पाच कोटी १६ लाख खर्च
डांबरीकरण करणे, जलवाहिन्या टाकणे. बहुस्तरीय टाक्या व जलशुद्धीकरण केंद्र बांधणे आदी कामांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली आहे. कामासाठी पाच कोटी १६ लाख ७१ हजार रु पये खर्च येणार आहे.