नवी मुंबई, पनवेल : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील तीन ठिकाणी हल्ला केल्यानंतर पनवेलसह नवी मुंबईमधील नागरिकांनी जल्लोष केला. काश्मीरमधील जवानांवरील हल्ल्याचा सैनिकांनी बदला घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली असून, फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
काश्मीरमधील पुलवामामध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्यास जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी देशवासीयांकडून केली जात होती. हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील तीन ठिकाणची जैश ए मोहम्मदची ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचे समजताच नवी मुंबईकरांनी जल्लोष सुरू केला. शिवसेना व भाजपा पदाधिकाऱ्यांनी वाशीमधील शिवाजी चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी केली. शहरात पेढे वाटले. पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. काश्मीरमधील हल्ल्याचा बदला घेतल्याविषयी समाधान व्यक्त केले. वाशीमधील जल्लोषप्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विठ्ठल मोरे, विजय माने, एम. के. मढवी, रंजना शिंत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
नेरुळमध्ये रहिवाशांनी साखर वाटून भारतीय जवानांच्या पराक्रमाचे कौतुक केले. आर्मी कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सैन्य दलामधील अधिकाऱ्यांनीही हवाई दलाच्या पराक्रमाचा सर्वांना अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १९६५ व १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त कर्नल प्रताप शंकर शिंदे, एस. बी. खन्ना व इतरांनी यापूर्वीच्या युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. या घटनेमुळे पाकिस्तान हादरला असल्याची प्रतिक्रियाही शहरवासीयांनी व्यक्त केली. पनवेल परिसरामधील नागरिकांनीही देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी सैनिकांनी केली असल्याचे मत व्यक्त केले. पनवेल भाजपा कार्यालयामध्ये सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकाºयांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.