नेवाळीत कोम्बिंग आॅपरेशन
By Admin | Published: June 24, 2017 12:35 AM2017-06-24T00:35:19+5:302017-06-24T00:35:19+5:30
नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले, उद्रेकासाठी त्यांना कोणी फूस लावली, याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन केले.
या वेळी पोलिसांनी नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली या गावातील घरांच्या दारावर लाथा मारल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. घराबाहेर असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घरातील महिला व लहान मुलांनी रात्र जागून काढली, असा आरोप गावकऱ्यांनी केला. तो पोलिसांनी फेटाळून लावला. पण या घटनेचे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, असा दावा गावकऱ्यांनी केल्याने पोलीस-गावकऱ्यांतील संघर्ष चिघळला आहे. आंदोलनानंतर आता गावात पोलिसांच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नेवाळी परिसरात आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता होती.
रास्ता रोको आणि मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते आमचे आंदोलन शांततेत सुरु होते. पोलिसांनी भाल गावातील महिला मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केल्याने पुरुष आंदोलकांनी प्रतिकार करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली, असा त्यांचा युक्तिवाद आहे; तर पोलिसांनी मात्र आंदोलक हिंसक झाल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी दगडफेक करुन दंडुक्यांनी मारहाण करत जाळपोळ करत आंदोलनाला हिंसक वळण दिले. त्यामुळे गुरूवारी रात्री डोंबिवलीत १५० ते २०० जणांविरोधात आणि शुक्रवारी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस
ठाण्यात २५० ते ३०० आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलकांपैकी शंभराहून अधिक जण हल्लेखोर असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. हे हल्लेखोर गावातील आहेत की आसपासच्या परिसरातील आहेत, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी वेगवेगळ््या मार्गांनी सुरू केले आहे.
पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हे दाखल करून हिंसक आंदोलकांचा शोध घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्या आंदोलकांच्या शोधासाठी पोलिसांनी मध्यरात्री कोम्ंिबग आॅपरेशन सुरु केले. नेवाळी, नेवाळी पाडा आणि चिंचवली परिसरात पोलीस रात्रीच्या सुमारास घुसले. पण दारे उघडली जात नसल्याने त्यांनी दारावर लाथा मारल्या, असा आरोप गावकऱ्यांनी केला: तर काही महिलांनी पोलिसांनी रात्री पुन्हा पेलेट गनमधून गोळ््या झाडल्याचा आरोप केला.
पोलिसांनी गाड्या उलथवून टाकल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. रस्त्यावर घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी वातावरण शांत करण्याऐवजी लगेचच कोम्ंिबग आॅपरेशन करुन करुन तणाव वाढवला. त्यामुले गुरूवारच्या आंदोलनानंतर नेवाळी परिसरातील शाळा-कॉलेज दुसऱ्या दिवशीही बंद होती. मुलांच्या मनातही भीती होती. पोलिसांकडून बळाचा वापर सुरुच आहे. तसा वापर त्यांनी सुरुच ठेवला, तरी आंदोलन सुरु राहील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थ सुनील राणे यांनी दिला.
ग्रामस्थांनी पोलिसांवर केलेले आरोप पोलिसांनी मात्र फेटाळून लावले. आंदोलकांच्या शोधासाठी पोलीस गावात गेले होते. त्यांनी कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान केलेले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण पोलिसांनी गावात नुकसान केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.