- वैभव गायकरपनवेल: पनवेल महानगरपालिका हद्दीत वास्तव्यास असलेल्या तब्बल 11 सीआयएसएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली होती. यापैकी उर्वरित 141 जवानांचा कोविड 19 अहवाल निगेटिव्ह आल्याने पनवेलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात शनिवारी माहिती दिली. यापैकी कोरोनाग्रस्त 5 जवान हे कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 6 जणांवर कोविड 19 उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचार करण्यात येणार आहेत. 141 जवानांना होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापैकी 120 जण कळंबोली येथील सीआयएसएफच्या संकुलात आरोग्य विभागाच्या निगराणीत राहणार आहेत. तर उर्वरित 21 जण पनवेल महानगरपालिकेने स्थापन केलेल्या खारघर येथील ग्रामविकास भवनातील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये थांबणार आहेत.पुढील 14 दिवस पालिका या सर्व जवानांवर लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे शनिवारी पनवेल परिसरात कोरोनाच्या रुग्णात वाढ झालेली नाही. पनवेलमध्ये सध्या कोरोनाचे 15 रुग्ण आहेत. यापैकी एक रुग्ण बरा झाला असून त्याची कोविड 19 टेस्टदेखील निगेटिव्ह आली आहे. पालिकेने स्थापन केलेल्या खारघर शहरातील ग्रामविकास भवनात कोरंटाईन केलेल्या व्यक्तीची संख्या आता 24 झाली असून पनवेल शहरातील जिल्हा कोविड 19 रुग्णालयात 10 जण दाखल करण्यात आले आहेत.या नागरिकांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
CoronaVirus: मोठ्ठा दिलासा! सीआयएसएफच्या 'त्या' 141 जवानांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 8:28 PM