Navi Mumbai: नवी मुंबईवर १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, शहर सुरक्षेसाठी महानगरपालिकेची उपाययोजना
By नामदेव मोरे | Published: March 17, 2023 03:52 PM2023-03-17T15:52:52+5:302023-03-17T15:53:57+5:30
Navi Mumbai: नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने शहरात १५०० हायडेफीनेशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७०२ कॅमेरे बसिवले असून ६३ कॅमेरे नियंत्रण कक्षाशी जोडले आहेत.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने शहरात १५०० हायडेफीनेशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७०२ कॅमेरे बसिवले असून ६३ कॅमेरे नियंत्रण कक्षाशी जोडले आहेत. शहरातील प्रत्येक सिग्नल, चौक, मार्केट, वर्दळीची ठिकाणे व बसडेपोवर कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
दिघा ते दिवाळे सीबीडीपर्यंत नवी मुंबईमधील प्रत्येक विभाग सुरक्षीत रहावा. गुन्हेगारी नियंत्रणात रहावी. वाहतुकीला शिस्त लावता यावी यासाठी महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामास गती दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात उभारलेल्या मुख्य नियंत्रण कक्षाला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. संपूर्ण शहरात १५०० कॅमेऱ्यांचे जाळे विणले जात आहे. ५९२ ठिकाणी कॅमेरे बसविण्यासाठीच्या खांबांसाठी काँक्रिटचा पाया तयार केला आहे. ५३४ खांत उभाण्यात आले आहेत. ५४० ठिकाणी विविध प्रकारचे कॅमेरे बसविले जात आहेत. २३० ठिकाणी प्रत्यक्षात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील मुख्य चौक, बस डेपो, मार्केट्स, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे,मनपा कार्यालये, पामबीच, ठाणे बेलापूर रोड, सायन पनवेल महार्गाचा समावेश आहे. शहरात ९५४ स्थिर कॅमेरे, ३६० इंशामध्ये गोलाकार चित्रण टिपणाऱ्या १६५ पीटीझेड कॅमेरे, सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ९ र्मल कॅमेरे बसविले जात आहेत.
पोलीस विभागाच्या सुविधेसाठी २४ ट्रॅफीक जंक्शनवर ९६ इव्हिडन्स कॅमेरे, २८८ एएनपीआर कॅमेरे बसविले जाणार आहेत. यामुळे स्वयंचलीत पद्धतीने वाहनावरील नंबर प्लेटचे वाचन केले जाणार आहे.यामुळे सिग्नल तोडणारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. २४ ट्रफिक जंक्शनवर अनाऊंसमेंट सिस्टीम बसविण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना आवश्यक त्या सूचना करता येणार आहेत. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी मनपा मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला भेट देऊन शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविषयीच्या कामाचा आढावा घेतला. सीसीटीव्ही छायाचित्रणाची बारकाईने तपासणी केली. यावेळी शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते.
शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा तपशील
एकूण कॅमेरे - १५००
बसविलेले कॅमेरे - ७०२
कॅमेरे बसविण्याची ठिकाणे - ५४०
स्थिर कॅमेरे - ९५४
गोलाकार चित्रण टिपणारे कॅमेरे - १६५
थर्मल कॅमेरे - ९
इव्हिडन्स कॅमेरे - ९६
एएनपीआर कॅमेरे - २८८