नवी मुंबई : रोडवर थुंकल्यास २०० रुपये दंड; स्वच्छतेच्या नियमांची होणार काटेकोर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:36 AM2017-12-21T01:36:08+5:302017-12-21T01:36:20+5:30
स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी अभियान राबवितानाच भविष्यात अस्वच्छता करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी क्लिनअप मार्शल योजना राबविली जाणार आहे. यामुळे रोडवर थुंकल्यास २०० रुपये व उघड्यावर शौचास गेल्यास १२०० रुपये दंड भरावा लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी वाहन धुणा-यांनाही १ हजार रुपये भरावे लागणार असून यासाठी सूचना व हरकती मागविण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी अभियान राबवितानाच भविष्यात अस्वच्छता करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी क्लिनअप मार्शल योजना राबविली जाणार आहे. यामुळे रोडवर थुंकल्यास २०० रुपये व उघड्यावर शौचास गेल्यास १२०० रुपये दंड भरावा लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी वाहन धुणा-यांनाही १ हजार रुपये भरावे लागणार असून यासाठी सूचना व हरकती मागविण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
स्वच्छ भारत अभियान २०१७ मध्ये नवी मुंबई महापालिकेचा देशात आठवा व राज्यात प्रथम क्रमांक आला. २०१८ च्या अभियानामध्ये देशात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छतेच्या मार्गातील अडथळे दूर करण्यावर विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरविली जाते. तंबाखू खाऊन रोडवर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºयांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मोकळ्या भूखंडावर व शासकीय जागेवर कचरा टाकणा-यांची संख्याही जास्त आहे. भाजी मार्केट, मटण विक्रेते, गॅरेज व इतर व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरवित असतात. या सर्वांचा शहराच्या स्वच्छतेवर गंभीर परिणाम होत असून अशा घटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी क्लिनअप मार्शल योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एजन्सीच्या माध्यमातून अस्वच्छता पसरविणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. उघड्यावर शौचास जाण्याबरोबर, डेब्रिज, सार्वजनिक ठिकाणी वाहने धुणे व इतर सर्व ठिकाणी अस्वच्छता करणाºयांना मोठा दंड भरावा लागणार आहे.
सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाचे स्वागत करताना त्यामधील त्रुटीही निदर्शनास आणून दिल्या. क्लिनअप मार्शलकडून नागरिकांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. कर्मचारी भ्रष्टाचार करण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे मार्शलने मनमानी केल्यास त्यावर नियंत्रण कोण ठेवणार, असा प्रश्नही अनेक नगरसेवकांनी उपस्थित केला. उघड्यावर शौचास जाणा-यांवर कारवाई करण्यापेक्षा जास्तीत जास्त शौचालये उपलब्ध करून द्यावीत अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. नागरिकांना सुविधा न देता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे योग्य होणार नाही, असे मतही अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले. पालिकेच्या कर्मचा-यांच्या प्रामाणिकपणावरही काही नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्वच्छतेसाठी या प्रस्तावाला पाठिंबा आहे, पण ही योजना चांगल्या पद्धतीने राबविली जावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
प्रथम सुविधा उपलब्ध करून द्या
शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, सोमनाथ वास्कर यांनी सर्वप्रथम सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी केली. क्लिनअप मार्शल योजनेच्या प्रस्तावावर नेत्रा शिर्के, द्वारकानाथ भोईर, चेतन नाईक, किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, मोनिका पाटील, संजू वाडे, विलास भोईर, रामदास पवळे,सरोज पाटील, अपर्णा गवते व इतर नगरसेवकांनी भूमिका मांडली.