नवी मुंबई : स्वस्तात सोन्याच्या बहाण्याने २८ लाख लुटले, दोघांना अटक
By सूर्यकांत वाघमारे | Published: May 31, 2024 07:25 PM2024-05-31T19:25:33+5:302024-05-31T19:25:47+5:30
व्यवहारासाठी बोलावून पळवली होती रोकड.
नवी मुंबई: स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने महिलेची २८ लाखाची रोकड लुटल्याची घटना नेरूळमध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महिलेसोबत ओळख वाढवून हा प्रकार करण्यात आला होता.
कामोठे परिसरात राहणाऱ्या महिलेचे २७ लाख ८१ हजार रुपये लुटल्याची घटना नेरूळमध्ये घडली होती. घोडबंदर परिसरात राहणाऱ्या व्यक्तींनी सदर महिलेसोबत ओळख वाढवली होती. यातून त्यांनी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोने असून ते स्वस्तात देतो असे सांगितले होते. त्यानुसार या महिलेला अर्धा किलो सोने २८ लाखात देतो असे सांगितले होते. दरम्यान या महिलेला पतीच्या उपचारासाठी देखील पैशाची गरज होती. यामुळे तिने वेगवेगळ्या मार्गाने २७ लाख ८१ हजारांची रोकड सोने खरेदीसाठी जमवली होती.
ही रोकड घेऊन महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून शेवटच्या क्षणी नेरूळमध्ये काहीजण त्यांना भेटले. त्याठिकाणी महिला पैशाची बॅग घेऊन येताच रिक्षातून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्या हातावर फटका मारून पैशाची बॅग पळवली होती. दरम्यान सोने देण्याच्या बहाण्याने संपर्कात असलेल्या दोघांची माहिती महिलेने व तिच्या पतीने काढली होती. त्याद्वारे दोघांना पकडून त्यांनी नेरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राकेश शिंगटे व सुभाष सपकाळे अशी त्यांची नावे असून ते घोडबंदर परिसरातले आहेत. मागील काही दिवसांमध्ये नवी मुंबईत अशा इतरही घटना घडल्या आहेत. त्यामध्ये स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना बोलावून त्यांची रोकड लुटण्यात आली आहे. त्यामध्ये याच टोळीचा समावेश आहे का ? याचा अधिक तपास नेरुळ पोलिस करत आहेत.