नामदेव मोरे नवी मुंबई : दोन हजार कोटींच्या ठेवी असणा-या नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थी वह्या, दप्तर व गणवेशापासून वंचित आहेत. २०१६-१७ वर्षासाठी फक्त १६ हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचे पैसे दिले आहेत. २०१७-१८ वर्षामध्येही एकही विद्यार्थ्याला साहित्य मिळालेले नाही. ‘फिफा’सह स्वच्छता अभियानावर करोडो रुपयांची उधळपट्टी करणारे प्रशासन गरीब विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे. शैक्षणिक साहित्य प्रकरणाचे खापरही पालकांवर फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.राज्यातील सर्व शहरांमध्ये महापालिका व नगरपालिकांच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी होऊ लागली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळाही बंद पडू लागल्या आहेत. विद्यार्थीच नसल्याने मुंबई महापालिकेनेही अनेक शाळा बंद केल्या असून, दुसरीकडे नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. महापालिका विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, दप्तर, बुट, मोजे, पी.टी.गणवेश, स्काउट गाइड गणवेश पुरविते. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या; परंतु २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा ठेका वादग्रस्त ठरला. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निविदा प्रक्रिया रद्द केली व फेरनिविदा मागविल्या. या प्रक्रियेस विलंब झाल्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप होऊ शकले नाही. डिसेंबरमध्ये राज्य शासनाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी रोख रक्कम थेट बँक खात्यात देण्याचा अद्यादेश काढल्यामुळे साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही. जून २०१७मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर गतवर्षीच्या योजनेसाठी बिले सादर करण्याचे आवाहन केले होते.माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी याविषयी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. डिसेंबर २०१७पर्यंत १६,५१५ विद्यार्थ्यांना वह्या, १५,७८३ विद्यार्थ्यांना दप्तर, ११,२३२ विद्यार्थ्यांना बुट व मोजे, १५,८८६ जणांना शालेय गणवेश, ९६१ विद्यार्थ्यांना स्काउट व गाइडचा गणवेश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ४५ टक्के विद्यार्थी साहित्यापासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली ते आठवीपर्यंत ३०,४०१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या वर्षी एकही विद्यार्थ्याला साहित्याचे वाटप करण्यात आलेले नाही. शिक्षण मंडळ व महापालिकेचे अधिकारी नियमावर बोट ठेवून पालकांनी बिले सादर केली की, त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ पैसे जमा करणार असल्याचे सांगत आहेत; परंतु ही पळवाट असून गरीब विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक शैक्षणिक साहित्यापासून वंचित ठेवले जात आहे. थेट बँक खात्यात पैसे टाकण्याची योजना योग्य प्रकारे राबविली जात नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नसून, अशीच स्थिती राहिली तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम पटसंख्या व शाळेच्या दर्जावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.विमा योजनेचा लाभ नाहीवाशीतील महापालिकेच्या मनीषा विद्यालयामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्याला एनएमएमटीने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेला दोन वर्षे होत आली असून, अद्याप त्याच्या पालकांना विम्याची रक्कम मिळू शकलेली नाही. माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी याविषयी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. विमा कंपनीने करारनाम्यातील अटीचे पालन न करता विमा परतावा देण्यास नकार दिल्यामुळे शिक्षण मंडळाने ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याविषयीही लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे.विद्यार्थ्यांचा दोष कायशैक्षणिक साहित्य पुरविण्यामध्ये राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत असल्याचे उत्तर पालिका प्रशासन देत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी वेगवेगळी भूमिका घेत आहेत. बिले सादर करण्यावरूनही गोंधळ आहे. बिले देणे, पैसे जमा होणे व परत ते पैसे ठेकेदाराला द्यायला लावण्यासाठीही शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक प्रयत्न करत असल्याचे आरोप होऊ लागले होते. या आरोप-प्रत्यारोप व राजकारणामध्ये गरीब विद्यार्थी मात्र भरडला जात असून, आमचा दोष काय? आम्हाला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न विद्यार्थी व पालकही उपस्थित करत आहेत.शासनाला दिला अहवालमहापालिका शाळेत गतवर्षी व यावर्षीही सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करता आलेले नाही. साहित्य वाटपामध्ये आलेल्या अडचणींविषयी अहवाल पालिकेने शासनाला दिलेला आहे. राज्य शासन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.इयत्तानिहाय विद्यार्थी संख्याइयत्ता विद्यार्थीपहिली ३,८६९दुसरी ३,९३५तिसरी ३,९७२चौथी ४,०६६पाचवी ३,८७९सहावी ३,७९२सातवी ३,६०१आठवी ३,२८७
नवी मुंबई : श्रीमंत महापालिकेत गरीब विद्यार्थ्यांची चेष्टा, ३० हजार विद्यार्थी शैक्षणिक साहित्यांपासून वंचितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 2:50 AM