Navi Mumbai: एपीएमसीतल्या व्यापाऱ्यांची ७२ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 1, 2023 09:43 PM2023-03-01T21:43:04+5:302023-03-01T21:43:37+5:30
Navi Mumbai:
नवी मुंबई : उधारीवर कडधान्ये घेऊन व्यापाऱ्यांची ७२ लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. मुंबईतल्या दुकानांवर वेळोवेळी माल मागवून त्याच्या बिलाची रक्कम न देता हि फसवणूक झाली आहे.
अशोक गुप्ता असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुप्ता याने एपीएमसी आवारातील व्यापाऱ्यांकडून दलालांमार्फत अथवा थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या मुंबईतल्या चार दुकानांवर कडधान्यांचा माल मागवला होता. सुरवातीला काही मालाचे पैसे देऊन विश्वास मिळवल्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणात माल मागवला. मात्र त्यानंतर त्याने बिलाची रक्कम न देता व्यापाऱ्यांशी संपर्क तोडण्यास सुरवात केली. अशाच प्रकारे परेश कटारिया या व्यापाऱ्याची देखील फसवणूक झाली आहे. यामुळे त्यांनी एपीएमसी पोलिसांशी संपर्क साधला असता अशोक गुप्ता याने इतरही अनेक व्यापाऱ्यांना उधारीवर माल घेऊन फसवले असल्याचे समोर आले. त्यामध्ये एकूण ७२ लाखाची फसवणूक समोर आली असून त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.