नवी मुंबई - मानवी तष्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून तरुणाची २३ लाख २५ हजाराची फसवणूक केली आहे. कॅनडा मधून तरुणाच्या नावे आक्षेपार्ह पार्सल आले असल्याचे सांगून सायबर गुन्हेगारांनी त्याला गळाला लावले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपर खैरणेत राहणाऱ्या सुमित अग्रवाल याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. गतमहिन्यात त्याला एका व्यक्तीने फोन करून तो कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच सुमित याच्या नावे कॅनडा मधून पार्सल आले असून त्यामध्ये पासपोर्ट व पैसे आहेत असेही सांगण्यात आले. त्यामुळे मानवी तष्करीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असून पोलिसांमार्फत कारवाईची भीती त्याला दाखवण्यात आली. यासाठी स्वतःला लखनऊ चे पोलिस सांगणाऱ्या गणवेशधारी व्यक्तींनी व्हिडीओ कॉलवर त्याच्यासोबत बोलणे देखील केले.
यानंतर कारवाई टाळायची असल्यास त्याच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. त्यांना घाबरून तरुणाने वेगवेगळ्या पर्यायाने पैशाची जमवाजमव करून त्यांना २३ लाख २५ हजार रुपये ऑनलाईन पाठवले. त्यानंतर मात्र संबंधितांनी संपर्क टाळल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार केली असता अज्ञात ५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.