Navi Mumbai: युनिटी मॉल, लॉजिस्टिक पार्कसह सागरी मार्गास गती द्या, विजय सिंघल यांचे निर्देश
By कमलाकर कांबळे | Published: March 7, 2024 07:34 PM2024-03-07T19:34:39+5:302024-03-07T19:35:01+5:30
Navi Mumbai: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध महत्वकांक्षी प्रकल्पांना भेट देवून पाहणी केली.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई - सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध महत्वकांक्षी प्रकल्पांना भेट देवून पाहणी केली. नवी मुंबई शहर आणि येथील रहिवाशांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले हे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
विजय सिंघल यांनी व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारताच कामाचा धडका लावला आहे. सिडकोच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने त्यांनी सकारात्मक प्रयास चालविले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर गुरूवारी एमटीएचएल- उलवे जंक्शन, प्रस्तावित युनिटी मॉल, उलवे येथील भूमिपूत्र भवन, बामणडोंगरी येथील गृहनिर्माण योजना, उलवे सागरी मार्ग, जेएनपीए व सिडको अधिकारक्षेत्रातील उपलब्ध आणि प्रस्तावित दळवळण यंत्रणा उलवे व द्रोणागिरी नोड आणि लॉजिस्टिक्स पार्क या प्रकल्प स्थळांना भेट दिली. या भेटी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी प्रकल्पाच्या सद्यस्थितीविषयी चर्चा केली व प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने करण्याच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, दिलीप ढोले, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, मुख्य नियोजनकार रवींद्र मानकर, परिवहन आणि विमानतळ विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक गीता पिल्लई, मुख्य अभियंता (नवी मुंबई विमानतळ) शीला करुणाकर, अतिरिक्त मुख्य अभियंता प्रभाकर फुलारी आदींसह संबधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सिडकोचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. सर्वसामान्य नागरिक, स्थानिक कारागीर, व्यवसायिक तसेच प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांची जलद अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने या सर्व प्रकल्पांच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेतल्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.