नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत प्रत्येक विभागात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नेरूळ रेल्वे स्टेशन समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. ऐरोली दिवा सर्कल, सीवूड येथेही मराठा समाजातील नागरिक आंदोलन करत आहेत. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
नेरूळमध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनात सर्व संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. अनेक नागरिकांनी सोमवारी नोकरी, व्यवसायास सुट्टी घेऊन उपोषणात सहभाग घेतला. जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळेस करण्यात आला आहे. आंदोलनामध्ये दत्ता फडतरे , स्वप्नील घोलप , दादा पवार . नितिन नाईकडे , डी डी कोलते , सुहास चव्हाण , राजु मांडरे , अभिजित भोसले , प्रशांत सोळस्कर ,करण पाटील , आनंद शेवाळे ,दिलीप आमले ,बबन पाटील अरविंद जाधव, सचिन माने,जतिन धनावडे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत.
मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून ऐरोली, दिवा, दिघा परिसरातील नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. सकल मराठा समाजाच्या माध्यमातून सीवूड सेक्टर ४८ येथेही आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण नवी मुंबईतील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.