नवी मुंबई : नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे फ्लेमिंगोंना धोका आहे. बीएनएचएससारख्या संस्थांनी याबाबत इशारा देऊनही नवी मुंबईतील पाणथळ जागा, फ्लेमिंगोंचे निवासस्थान पद्धतशीरपणे संपविण्याचे काम केले जात आहे. हे पक्षी, त्यांचे पारंपरिक गंतव्यस्थान चुकवल्यास पनवेल खाडीलगत असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या ठिकाणी उतरू शकतात.
अटल सेतूसाठी वन्यजीव प्रतिबंधात्मक उपायांचा एक भाग म्हणून, राज्य सरकारने शिवडी-माहूल, एनआरआय-टीएस चाणक्य आणि पाणजे-डोंगरी पाणथळ जागा येथे पक्षी अभयारण्य नियोजित केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ते जाहीर केले होते; परंतु त्यावर कार्यवाही झालेली नाही, असे मत नॅट कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी व्यक्त केले. महामुंबई परिसरात हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात फ्लेमिंगो वास्तव्य करतात, असे बीएनएचएस अर्थात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक मृगांक प्रभू यांनी सांगितले.
‘बीएनएचएस’ने केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष- अदानी विमानतळ प्राधिकरणानेही आपल्या पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवालात बीएनएचएसने सुचविल्यानुसार पाणथळ संरक्षित केली जाईल, असे म्हटले आहे.- नवी मुंबई विमानतळासाठी पर्यावरण मंजुरीच्या नूतनीकरणासाठी सादर केलेल्या अहवालातही एनआरआय पाणथळीवर नियोजित गोल्फ कोर्स रद्द केल्याचेही म्हटले आहे. तरीही ही पाणथळ नष्ट करण्याचे कारस्थान सुरू असल्याचे डीपीएस व एनआरआय तलाव वाचविण्यासाठी लढा देणारे सुनील अगरवाल म्हणाले.
एमएमआर परिसरात मोठ्या प्रमाणावर एलईडी लाइटस लावण्यात आल्या आहेत. त्याचा फटका फ्लेमिंगोंना बसत आहे. कारण एलईडी लाइटमुळे प्रकाश प्रदूषण होत असून, पक्ष्यांच्या मार्गात अडथळे येतात. शवविच्छेदन अहवालानंतर फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे समोर येईल. मात्र, फ्लेमिंगो परिसंस्थांची मोठी हानी होते आहे.- पवन शर्मा, संस्थापक, आरएडब्लूडब्लू
- नवी मुंबई एन्व्हायर्नमेंटल प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन म्हणाले की, पक्ष्यांचा अपघात हृदयद्रावक आहे. - देशात शहरी भागातील एकमेव रामसर साइट असलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात सुमारे एक लाख फ्लेमिंगो उडत असतात.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या खाडीत मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो आढळून येतात. हिवाळा सुरू होताच गुजरातहून मुंबई परिसरात फ्लेमिंगो स्थलांतरित होतात. उन्हाळा संपताना पुन्हा त्यांचे स्थलांतरण होते. एमएमएम परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे उडत असतानाच हा अपघात झाल्याची दाट शक्यता आहे.- सुनिष सुब्रमण्यन, मानद प्राणी कल्याण अधिकारी