नवी मुंबई विमानतळ: १० किमी परिघात प्राणी कत्तल, कचरा आणि घातक पदार्थ टाकण्यास मनाई
By नारायण जाधव | Updated: January 7, 2025 07:14 IST2025-01-07T07:13:08+5:302025-01-07T07:14:06+5:30
एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन, सुरळीत संचालन होणार

नवी मुंबई विमानतळ: १० किमी परिघात प्राणी कत्तल, कचरा आणि घातक पदार्थ टाकण्यास मनाई
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कोणत्याही परिस्थितीत एप्रिलपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प सिडको आणि विकासक अदानी एअरपोर्ट कंपनीने केलेला असतानाच, आता राज्याच्या नगरविकास विभागानेही ‘एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समिती’ची स्थापना करून एक पाऊल पुढे टाकले आहे.
यानुसार विमानतळाच्या बिंदूपासून १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करणे, त्यांची कातडी वा अवशेष टाकणे, कचरा व इतर घातक पदार्थ टाकण्यास मनाई करण्यात येणार आहे. ‘एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्यात येणार आहेत.
२० अधिकाऱ्यांचा समावेश
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक या समितीचे अध्यक्ष राहणार असून, विभागीय कोकण आयुक्त, नवी मुंबई पालिका आणि पनवेल पालिका आयुक्त, नवी मुंबई पोलिस आयुक्त, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त, रायगडचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, नागरी विमान वाहतुकीचे महासंचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एअरलाइन कंपन्यांचे प्रतिनिधी, कोकण पाटबंधारे महामंडळाच्या संचालकांसह २० अधिकाऱ्यांचा एरोड्रोम समितीत समावेश आहे. विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असल्याचे नगरविकास विभागाने ६ जानेवारीच्या निर्णयात म्हटले आहे.
ही आहे समितीची कार्यकक्षा
- विविध प्रकारचे पक्षी प्राण्यांचे टाकलेले अवशेष खातात. यामुळे विमानतळ परिसरात असे अवशेष टाकल्यास पक्ष्यांची संख्या वाढून त्यांचा ये-जा करणाऱ्या विमानांना धोका निर्माण होऊन अपघात होण्याची भीती आहे.
- यामुळे विमानतळाच्या १० किमीच्या त्रिज्येच्या परिसरात प्राण्यांची कत्तल करून त्यांचे अवशेष फेकण्यास मनाई केली आहे. याबाबतचा निर्णय समितीने घ्यायचा आहे.
- नागरी विमान वाहतूक आवश्यकता मार्गदर्शिका सीएआर ४, ब.१ अनुच्छेद ०.४.४ आणि २०१० च्या एरोड्रोम ॲडव्हायझरी सेक्युलर - एडी एसी ६ चे पालन करणे आवश्यक आहे. त्याच्या तरतुदी विचारात घेऊन निर्णय घेणे.
- हवाई अड्ड्याच्या आसपास १० ते १० किमीच्या क्षेत्रात पर्यावरणीय स्वच्छता ठेवण्यासाठी उपाययोजना समितीने सुचवायच्या आहेत.
- समितीने प्रत्येक महिन्याला बैठक घेणे आवश्यक राहील. समिती सदस्यांव्यतिरिक्त इतर अन्य सदस्यांना बैठकीस आमंत्रित करता येईल.
‘या’ विमानतळांची कामे मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळाचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी आयोजित राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. राज्यातील ११ विमानतळांचा आढावा घेण्यात आला.
विमान वाहतूक हे सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. देश ५ ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करत असताना, हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाइट लँडिंग होईल, असे नियोजन करा, तसेच शिर्डी नाइट लँडिंग सुविधा लगेच सुरू करा, नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवा, असे फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.
जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा, पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
वाढवणला नवीन विमानतळ?
- वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे. जगातील सर्वांत मोठ्या १० बंदरांपैकी एक हे बंदर असणार आहे. देशातील सर्वांत मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे.
- या भागातून बुलेट ट्रेन, कोस्टल रोड जाणार आहे. या ठिकाणी चौथी मुंबई साकारणार आहे, यासाठी वाढवण येथे नवीन विमानतळाचा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.