लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटलांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून सोमवारी आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त ओवळेफाटा याठिकाणी एकत्र आले होते. मात्र, आंदोलनापूर्वीच विमानतळाचे काम कंत्राटदारांनी बंद ठेवले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यास येथील प्रकल्पात विस्थापित होत असलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. ओवळेफाटा याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रकल्पग्रस्त नेत्यांची भाषणे पार पडली.
या सभेत नेत्यांच्या भाषणात मोठ्या प्रमाणात सिडकोविरोधात नाराजीचा सूर उमटला. दरम्यान, या सभेला मार्गदर्शन करताना कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी विमानतळाच्या साइटवर काम बंद पाडण्यासाठी सर्वप्रथम पाच जणांचे शिष्टमंडळ जाईल, असे सांगितल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या एका गटाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. विमानतळाच्या कामाच्या ठिकाणी सर्व जणांनी जाऊन हे काम एका दिवसासाठी नाही, तर कायमस्वरूपी बंद पाडण्याचा आग्रह प्रकल्पग्रस्तांच्या एका गटाने धरला. दरम्यान, पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने काही प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी काम बंद असल्याची खात्री केली. यामध्ये आमदार महेश बालदी यांचा समावेश होता. या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या भाषणादरम्यानच आंदोलकांनी घरचा रस्ता धरण्यास सुरुवात केली.
एक महिन्याची मुदतमहिनाभरात सिडको प्रशासनाने दहा गावांतील विस्थापित झालेल्या ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न केल्यास तसेच सिडकोने दि.बां.च्या नावाबाबत आपली भूमिका न घेतल्यास २४ फेब्रुवारी रोजी विमानतळाचे काम कायमस्वरूपी बंद पाडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त कृती समितीने दिला आहे.
सिडकोच्या एमडींना बंगालीमध्ये आवाहनसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी हे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ॲडव्होकेट विक्रांत घरत यांनी केला. यावेळी बंगाली भाषिक असलेल्या डॉ. मुखर्जींना कर्बो, लोर्बो, जीतबो असे सांगत, आम्ही लढाई जिंकणारच, असे सांगितले.
११०० पोलिसांचा फौजफाटाया सभेवेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. जवळपास ११०० पोलिसांचा ताफा या ठिकाणीबंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता.पोलीस उपायुक्त शिवराज पाटील हे स्वतः आंदोलनावर लक्ष ठेवून होते.